हणजूण : पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा खून करण्यात आला असल्याचा त्यांचा भाऊ रिंकू ढाका याचा दावा खरा ठरला. त्यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान व मित्र सुखविंदर सिंग यांनी त्यांना मारल्याचे कबुली दिल्याची माहिती गोवा पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी हणजूण पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
बिष्णोई म्हणाले, संशयितांनी सोनाली फोगाट यांना पाण्यातून अमली पदार्थ पाजल्याचे प्रथमदर्शनी जबाबातून सांगितले आहे. त्यांना हा अमली पदार्थ कोठे दिला याचा तपास पोलिस कोठडीत घेतल्यानंतर केला जाणार आहे. ते जेवायला गेलेल्या कर्लीस बारमध्ये आणखी दोन युवती त्यांच्यासोबत होत्या, अशी माहिती तेथील एका कर्मचार्याने दिली आहे. सोनाली यांना त्या बारमधून कोणत्या स्थितीत हॉटेलवर आणले व हॉटेलातून रुग्णालयात नेले याची चौकशी सुरू असून त्या टॅक्सी चालकांचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. तज्ज्ञाकडून त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. सध्या दोन्ही संशयितांना 302 कलमाखाली अटक करण्यात आली आहे, असे आयजीपी ओमवीर सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी त्या हॉटेलावर व कर्लीस बारवर जाऊन तपासणी केली.