Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला तात्पुरता दिलासा

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez ) मनी लॉंड्रिंग प्रकरणात दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने जॅकलिनला अटकेपासून अंतरिम संरक्षण १५ नोव्हेंबर पर्यंत वाढवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंदर मलिक यांनी जॅकलिनच्या जामीन याचिकेवरील अंतिम आदेशाचा निर्णय मंगळवारपर्यंत पुढे ढकलला आहे. फर्नांडिस तसेच सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वकिलांकडून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने अभिनेत्रीच्या जामीन अर्जावरील आदेश गुरूवारी राखून ठेवला होता. (Jacqueline Fernandez )

२६ सप्टेंबर रोजी न्यायालयाने अभिनेत्रीला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने जॅकलिनला ऑगस्ट महिन्यात समन्स बजावला होता. पुरवणी आरोपत्रात पहिल्यांदाच तिचा नावाचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आला होता. २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी चंद्रशेखरने गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाचा वापर फर्नांडिससह सेलिब्रिटींना लक्झरी वस्तू भेट देण्यासाठी केला, असा दावा ईडीने केला आहे.

जॅकलिन तपासात पूर्णत: सहकार्य करीत आहे. ती देश सोडून पळून गेल्याचा ईडीकडून करण्यात आलेला आरोप निराधार आहे. अभिनेत्री स्वत: न्यायालयाला शरण आली आहे. न्यायालयाने अंतरिम जामिन दिल्यानंतर देखील ईडी तिला त्रास देत असल्याचा आरोप जॅकलिनच्या वकिलाने केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news