श्वेता शिंदे आणतेय नवी मालिका ‘शेतकरीच नवरा हवा’ (VIDEO) | पुढारी

श्वेता शिंदे आणतेय नवी मालिका 'शेतकरीच नवरा हवा' (VIDEO)

पुढारी ऑनलाईन : २१ व्या शतकात सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध असताना देखील सामान्य माणूस असो किंवा गडगंज संपत्ती असलेला माणूस असो तो शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावर विसंबून आहे. शेतकरी हा शब्द ऐकताच आपला माणूस, जिव्हाळा, प्रेम आणि आदर अशा भावना आपल्या मनात येतात तर दुसरीकडे डोळ्यासमोर येतं ते त्यांच्या हालअपेष्टा, त्यांचे काबाड कष्ट, रात्रंदिवस त्याचे परिस्थितीशी झटणं. आपण नेहमीच वृत्तामध्ये त्यांच्या होणाऱ्या आत्महत्या बघतो आणि वाचतो. त्यांच्यामुळे आपण चार घास खाऊ शकतो त्यांची ही परिस्थिती आहे. पण, हे सगळं असताना अनेक ठिकाणी मुलींना शेतकरी नवरा नको असतो, शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नसतो. तिथे एका उच्चभ्रू घराण्यातील शहरी, सुशिक्षित मुलगी, जेव्हा म्हणते मला “शेतकरीच नवरा हवा” तेव्हा काय होईल? यावरच आधारित एक मालिका चाहत्याच्या भेटीस येत आहे. आजकाल समाजामध्ये अशा किती मुली आहेत ज्यांना शेतकरी मुलाशी लग्न करायचे आहे? कसा असेल रेवा आणि सयाजीचा प्रवास ? कसं फुलेल यांच्यातील प्रेम ? शुभारंभ होत आहे. स्वप्नील गांगुर्डे लिखित आणि वज्र प्रॉडक्शन निर्मित “शेतकरीच नवरा हवा” १४ नोव्हेंबरपासून चाहत्याच्या भेटीस येत आहे.

शेतीविषयी विशेष प्रेम असलेला सुशिक्षित, समजूतदार, देखणा असा सयाजी. सयाजीचे ध्येय लहानपणापासून ठरलेलं आहे, आजोबांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी त्याने सुरुवातीपासून आपले सर्वस्व शेतीसाठी पणाला लावले. अॅग्रीकल्चर (Agriculture ) मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शेतीला पुन्हा सोन्याचे दिवस आणायचे हा त्याचा ठाम निर्धार आहे. तर दुसरीकडे आधुनिकतेचा वसा जपणारी, कॉर्पोरेट जगात वावरणारी रेवा जेव्हा सयाजीला भेटेल तेव्हा काय होईल ? कशी असेल यांची पहिली भेट ? ते म्हणतात ना रेशीमबंधांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणे. नशीब अशाप्रकारे गोष्टी जुळवून आणतं की व्यवसायाने आर्किटेक्चर (architect ) रेवा सयाजीच्या गावी येते. इथून सुरुवात होते मातीशी नातं जोडलेल्या सयाजी आणि रेवाच्या एका वेगळ्या प्रेमकथेला. ही प्रेमकथा कशी फुलेलं ? हे हळूहळू शेतकरीच नवरा हवा या मालिकेत उलगडणार आहे.

श्वेता शिंदे म्हणाली की, ‘गेली काही वर्षे आमच्या वज्र प्रोडक्शन्सकडून मराठी वाहिनीसाठी मालिका निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून आम्ही प्रयत्न करत होतो. ग्रामीण भागातील विविध संवेदनशील विषय अत्यंत मनोरंजकपणे मांडले आहेत. मनाला स्पर्श करणारी पात्रं तिथल्याच मातीतली वाटतील याची आम्ही नेहमीच काळजी घेतली आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा पण आज त्यांचंच जगणं अवघड होऊन बसलंय शेतकरी नवरा कोणालाच नको आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतकरी पण मुलगी द्यायला तयार नाही तर इतरांचं काय, मराठी वाहिनीने आम्हाला “शेतकरीच नवरा हवा” ही मालिका बनवण्याची संधी दिली व सध्या ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या समस्येवर आम्हाला प्रकाश टाकता आला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार ही मालिका पाहून चार मुली जरी म्हणाल्या की “शेतकरीच नवरा हवा” तरी आमच्या कष्टाचं सार्थक होईल.’

हेही वाचलंत का? 

Back to top button