अजून दिल्ली माझ्यासाठी दूर : धनंजय मुंडे

अजून दिल्ली माझ्यासाठी दूर : धनंजय मुंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. याबाबत आमदार धनंजय मुंडे यांनी छेडले असता दिल्ली माझ्यासाठी दूर आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा विचार नसून पक्षानेही तशी माझ्याशी काही चर्चा केलेली नाही. अजून किमान वीस ते पंचवीस वर्ष मी याबाबत विचार करु शकत नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर येथे ९ जूनरोजी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यव्यापी सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी बीडमध्ये आयोजित बैठकीसाठी आमदार मुंडे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यमान खासदार हे निष्क्रीय असल्याचे जनतेलाच दिसते आहे. लातूरला जो रेल्वे कोच निर्मितीचा प्रकल्प झाला, तो बीडला झाला असता तर जवळपास पन्नास हजार कोटींची गुंतवणूक बीडमध्ये झाली असती. तो प्रकल्प बीडला आणण्यात खासदारांना अपयश आले.

वैद्यनाथमधील ॲडजस्टमेंटबाबत धनंजय मुंडे म्हणाले, माझा प्रवास कमळाकडे नसून त्यांचा (पंकजा मुंडे) प्रवास घड्याळाकडे आहे का ?, असा प्रश्न त्यांना विचारायला हवा. वैद्यनाथ कारखाना हा दिवंगत गोपीनाथ मुंडे, पंडितअण्णा मुंडे यांनी उभा केलेला आहे. सध्या या कारखान्यावर १ हजार कोटींचे कर्ज असून या कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यातही वैद्यनाथची निवडणूक अजून बिनविरोध झालेली नाही, असेही मुंडे म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news