केज; पुढारी वृत्तसेवा : केज शहरामध्ये घराच्या भिंतीचे पाडकाम करताना ती भिंत मजुराच्या अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखद घटना घडली आहे.
या बाबत माहिती अशी की, बुधवार (दि. २४ मे) केज शहरामध्ये रोजा मोहल्ला या भागातील दर्गाच्या पाठीमागे वास्तव्यास असणारे शेख नबी शेख लाला हे मजुरी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजीव गांधी उर्दु शाळेच्या समोर असलेल्या जुन्या घराची भिंत पाडकाम ते करीत होते. दुपारी २:३० ते ३:०० च्या सुमारास पाडकाम सुरू असलेली घराची भिंत त्याच्या अंगावर कोसळली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमी शेख नबी शेख लाला यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविले होते. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू असंताना सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली असा परिवार आहे.
दरम्यान अशा घटना आणि अपघात टाळण्यासाठी मजूर आणि मालक यांनी खबरदारी घेऊन सुरक्षित ता बाळगणे आवश्यक आहे. तर शेख नबी शेख लाल यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.