केज, पुढारी वृत्तसेवा :- केज तालुक्यात खळबळजनक घटना घडली असून एकाच वर्गात शिकत असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण तिच्या मैत्रिणीच्या भावानेच केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दि. २३ मे रोजी सकाळी १०:१५ वा. च्या सुमारास एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीची आई शौचास गेल्याची संधी साधून तिच्या वर्ग मैत्रिणीच्या सख्ख्या भावाने त्या अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचे अपहरण केले आहे.
या प्रकरणी अपहृत मुलीच्या आईच्या तक्रारी वरून अमर कदम रा. कदमवाडी ता. केज याच्या विरुद्ध त्याने अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणासाठी कळवून नेले म्हणून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. ९१/२०२३ भा. दं. वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रंगनाथ राठोड हे तपास करीत आहेत.