दबंगी – मुलगी आई रे आई : “स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते”

अभिनेत्री यशश्री मसुरकर
अभिनेत्री यशश्री मसुरकर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील दबंगी – मुलगी आई रे आई या मालिकेने एका चुणचुणीत आणि दबंगी तेवर असलेल्या या छोट्या आर्या (माही भद्रा) नावाच्या मुलीभोवती फिरणाऱ्या वेधक कथानकाच्या बळावर प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ही चिमुरडी आर्या आपल्या पित्याच्या शोधात आहे. आर्याचा असा समज आहे की, ती एका सुपर-कॉपची मुलगी आहे, पण प्रत्यक्षात मात्र ती सत्या (आमीर दळवी) या गुंडाची मुलगी आहे, जो सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो.

सध्या सुरू असलेल्या कथानकात, एक मोठे वळण आले आहे. कारण सत्याचा भाऊ इन्स्पेक्टर अंकुश (मानव गोहिल) आर्याची दैना पाहून आणि तिच्याविषयी कळवळा आल्याने तिला आपल्या घरी घेऊन येण्याचे ठरवतो. आपल्या घरी तिचा स्वीकार कसा होईल, याविषयी साशंक असलेला अंकुश आपली पत्नी बेला (यशश्री मसुरकर) हिला आर्याची ओळख 'आपल्या एका खबऱ्याची मुलगी' असा करून देतो. तिचे वडील गेल्याचे सांगतो. जेव्हा बेला आर्याला प्रेमाने आणि आपलेपणाने स्वीकारते, तेव्हा अंकुशला आश्चर्यच वाटते. त्यांची मुलगी झिया (नॅन्सी मकवाणा) हिला मात्र आर्याविषयी असूया वाटते आणि त्यामुळे ती नकोशी वाटते.

आपल्या बेला या व्यक्तिरेखेशी आपले कसे जवळचे नाते आहे. हे सांगताना यशश्री मसुरकर म्हणते, "मला वाटते, प्रत्येक स्त्रीमध्ये मातृत्वाची भावना उपजतच असते. त्यासाठी अभ्यास करण्याची किंवा अन्यत्र प्रेरणा शोधण्याची गरज भासत नाही, विशेषतः नॅन्सी आणि माही सारख्या मुलींबाबत तर नाहीच नाही. कारण, त्यांची निरागसता आणि प्रेम इतके शुद्ध आहे की त्यांच्याविषयी आपुलकी वाटण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. मला आर्यासोबत केलेले एक दृश्य आठवते. ज्यात मला रडायचे होते; तिचे वागणेच इतके निरागस होते की, मला ग्लिसरीनची गरजच वाटली नाही, मी आपसूकच रडू लागले.

आमच्या सेट्सवर फक्त तीनच मुले नाहीयेत, तर इथे प्रत्येक जण लहान मुलासारखाच आहे. मानव गोहिल तर सेटवरचा एक खोडकर मुलगा आहे. आणि त्याच वेळी तो इतका सुजाण आहे की, पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही त्याचे सगळ्यांशी छान जमते. मी साकारत असलेली बेला अत्यंत क्षमाशील आणि दिलदार आहे. हे तिचे गुण माझ्यातही असावेत असे मला वाटते. स्वतःची मुलगी असताना देखील ती दुसऱ्या मुलीवर तितकेच प्रेम करते, जे बोलण्याइतके करायला सोपे नाही. तिला जेव्हा आर्याच्या माता-पित्याविषयी समजते, तेव्हा तिच्यातील मातृत्व उफाळून येते आणि ती मनापासून आर्याची देखभाल करते. आपल्या परिवाराविषयीची तिची निष्ठा कौतुकास्पद आहे. तिचा हा स्वभावच मला फार आवडतो."

कथानकात पुढे सत्या आणि त्याचे कुटुंब अंकुशच्या घरी येतात आणि आर्याला भेटतात. अंकुशच्या जीवनात अडथळे उभे करण्यासाठी सत्या आणि कस्तूरी बेलाचे कान भारतात आणि तिच्या मनात संशयाचे बीज रोपतात. त्यामुळे 'आर्या खरी कोण आहे', याबद्दल ती अंकुशला सवाल करते. अंकुश बेलाला आर्याचे सत्य सांगेल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news