Cyclone Biparjoy : गुजरात किनारपट्टीवर आज बिपरजॉय वादळ धडकणार

Cyclone Biparjoy
Cyclone Biparjoy

गांधीनगर; वृत्तसंस्था : अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात समुद्रकिनार्‍यावर गुरुवारी धडकणार असून, ते अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणामुळे आतापर्यंत 50 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, कच्छ आणि सौराष्ट्र भागासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच या वादळाचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. (Cyclone Biparjoy)

वार्‍यांचा वेग 150 कि.मी. प्रतितासपर्यंत

चक्रीवादळामुळे येणार्‍या मुसळधार पावसाने सखल भागांत पाणी साचण्याची, पूर येण्याची आणि किनार्‍यालगत भरतीमुळे उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सौराष्ट्र, कच्छ आणि लगतचा पाकिस्तान किनारा ओलांडून मांडवी (गुजरात) आणि कराचीमधील (पाकिस्तान) तसेच जखाऊ बंदराजवळ (गुजरात) आज (दि.१५) संध्याकाळपर्यंत या वादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. त्यामुळे 125-135 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील. वार्‍यांचा वेग 150 कि.मी. प्रतितासपर्यंत वाढू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

आज (15 जून) कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर, मोरबी, जुनागड, राजकोट या भागांत चक्रीवादळामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे या भागांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे वादळ मांडवीत 130 ते 150 किलोमीटर वेगाने धडकू शकते. बुधवारी सायंकाळी ते जखाऊ बंदरापासून 290, द्वारकापासून 300 कि.मी. अंतरावर होते. या वादळामुळे कच्चे रस्ते, वीज यंत्रणा व पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१५) सौराष्ट्र, कच्छमध्ये मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. चक्रीवादळाचे परिणाम मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांतही जाणवत आहेत. पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबारमध्ये तुफान वेगाने वारे वाहून पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Cyclone Biparjoy :राजनाथ सिंह यांची सैन्यदल प्रमुखांशी चर्चा

चक्रीवादळामुळे निर्माण होणार्‍या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगाने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत चर्चा केली. कच्छमध्ये चक्रीवादळ आल्यानंतर ते राजस्थानपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वादळाचा मुकाबला करण्यासाठी सैन्यदलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्या तयारीचा सिंह यांनी आढावा घेतला. संकटकाळात नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश याआधीच देण्यात आले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news