पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनाचा जोर ओसरत असतानाच आता नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनची जगभरात सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नवीन नियमांचे ( COVID19 fresh restrictions ) पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे. नव्या व्हेरियंटमुळे सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. कोरोना प्रतिबंधनासाठीचे नियम हे ग्राहक, प्रवासी, सेवा पुरवठादार आदींसाठी बंधनकारक असतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड आकारण्यात येणार आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आता राज्यात प्रवासासाठीचे लवकरच नवे नियम लागू केले जाणार आहेत. राज्यात प्रवास करणार्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असेल. संबंधित प्रवाशाने दोन लस घेतल्या नसतील तर ७२ तासांपूर्वीचे आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
एखद्या सेवा पुरवठारदार, सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणारे कलाकार, खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक असणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणार्यांनीही दोन्ही लस घेणे आवश्यक असेल. सार्वजनिक वाहतुकीमधून दोन्ही लस घेतलेल्यांनाच प्रवासाची परवानगी असेल. १८ वर्षांच्या आतील व वैद्यकीय कारणास्तव लस घेता येणार नाही, अशांना वैद्कीय प्रमाणपत्र सादर करुन तर शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल.
विदेशातून राज्यात येणार्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार कार्यवाही होईल. तसच देशांतर्गत प्रवासी करण्यासाठी पूर्ण लसीकरण बंधनकारक असेल. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांनी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, चित्रपटगृह, नाट्यगृह व हॉलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असेल.
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार 'ॲक्शन मोड'
याबाबत पुणे येथे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे आंतरराष्ट्रीय विमानांबाबत काय करायचे त्याबद्दल केंद्र निर्णय घेणार आहे. त्या निर्णयाची आपल्याकडे अंमलबजावणी होईल. प्रवाशांना विलगीकरणात अथवा इतर कोणती उपाययोजना करायची याबाबत योग्य ती कार्यवाही केंद्राच्या सुचनेनंतर केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे डोमेस्टिक विमानातून प्रवास केल्यानंतर विमानतळावरील चेकिंग संदर्भातील काही नियम काढण्यात आले असून, विदेशातून येणाऱ्या लोकांना औपचारिकतेबाबत केंद्र शासन जो निर्णय घेईल त्याचे पालन करावे लागणार आहे. नाट्यगृह आणि इतर कार्यक्रमांना 1 डिसेंबर पासून 100% उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 1 डिसेंबर पासून शाळा या पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. या वेळी कार्यक्रमात, शाळेत कोविडचे नियम पाळूनच प्रवेश मिळणार आहे.
ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळं गरज पडल्यास राज्यातही काही निर्बंध लावावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम कडकरित्या पाळावेत, असे आवाहन राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रमण गंगाखेडकर ( Dr Raman Gangakhedkar) यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंट आणि त्याच्या परिणामाबद्दल आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील नवा व्हेरियंटची भीती किती खरी आहे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनची लक्षणे कोणती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वेगळी लक्षणे दिसतात का, हेही कळालेली नाही. तसेच त्याची तीव्रता, किती जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. किती जणांचा मृत्यू झाला याबाबतही अद्याप ठोस माहिती नाही. त्यामुळे आताच यावर खूप चर्चा करुन घाबरण्याचे कारण नाही. जगभरात कोणत्याही देशात नवीन व्हेरिएंट दिसला की तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.