पुढारी ऑनलाईन: भारतात गेल्या २४ तासांत १० हजार ११२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आत्तापर्यंतची कोरोना सक्रिय रूग्णांची संख्या ६७ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. एकूण ९ हजार ८३३ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शनिवारच्या कोविड रूग्णांच्या संख्येत थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
काल (दि.२२) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या १० हजारांवर कायम आहे. शनिवारी २२ एप्रिलला कोरोनाचे १२,१९३ नवे रुग्ण आढळून आले होते. शुक्रवारी २१ एप्रिलला ११,६२९, गुरूवारी २० एप्रिलला १२,५९१, बुधवारी १९ एप्रिलला १०,५४२, मंगळवारी १८ एप्रिलला ७,६३३ आणि सोमवारी १७ एप्रिलला ९,१११ इतक्या कोरोना रूग्णांची नोद आहे.
देशव्यापी राबवण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत, भारताने आतापर्यंत २२०.६६कोटी कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ९५.२१ कोटी लोकांनी पहिला डोस घेतला आहे तर, २२, ८७ कोटी लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. गेल्या २४ तासांत १,९४७ डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्राने मोठ्या संख्येने कोरोना प्रकरणे नोंदवणाऱ्या आठ राज्यांमध्ये काटेकोरपणे लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. कोरोना संसर्ग आणि त्याच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यास केंद्राने सांगितले आहे. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.