बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान ; चार मतदार संघांसाठी 31 केंद्रांवर मतदान | पुढारी

बाजार समितीसाठी शुक्रवारी मतदान ; चार मतदार संघांसाठी 31 केंद्रांवर मतदान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28) मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतदानाची तयारी सुरू केली आहे. एकूण 18 जागा आणि 4 मतदारसंघांसाठी 31 मतदान केंद्रांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये मतदारांच्या जादा संख्येमुळे सर्वाधिक 22 मतदान केंद्रे व्यापारी-अडते मतदारसंघासाठी आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 135 विकास सोसायट्या असून, या गटातून 11 उमेदवार निवडून दिले जातात. ग्रामपंचायतींची संख्या 67 असून, या गटातून 4 उमेदवार निवडून दिले जातात. व्यापारी – अडते मतदारसंघातून 2 उमेदवार आणि हमाल-तोलारी मतदारसंघातून 1 उमेदवार निवडून दिला जातो. मतदान केंद्रावरील आवश्यक ती तयारी निवडणूक प्रशासनाने सुरू केली आहे.

उमेदवारांकडून निवडणूक चिन्हासह प्रचार

हमाल-मापाडी मतदारसंघ  ; एका जागेसाठी 5 उमेदवार रिंगणात

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हमाल-मापाडी मतदारसंघातील एका जागेसाठी 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक चिन्हांचे वाटप केलेले आहे. त्यामुळे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारपासून (दि. 22) बहुतांशी उमेदवारांनी निवडणूक चिन्हांसह मतदारांपर्यंत जाऊन प्रचारास सुरुवात केलेली आहे.

हमाल मापाडी मतदारसंघात संजय बाजीराव उंदे, राजेंद्र ज्ञानोबा चोरघे, गोपाळ निवृत्ती दसवडकर, संतोष मारुती नांगरे आणि गोरख मारुती मेंगडे हे 5 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत एकूण 2007 मतदार आहेत. पाच उमेदवारांची संख्या पाहता मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाणार यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे. हमाल-मापाडी मतदारसंघातून अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी भाजीपाला बाजारातील तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरघे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Back to top button