पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात 10 एप्रिलपासून सर्व प्रौढ म्हणजेच 18+ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली. हा बूस्टर डोस सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. याशिवाय, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी सरकारी लसीकरण केंद्रांमार्फत सुरू असलेल्या मोफत लसीकरण कार्यक्रमासोबतच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60+ वयोगटांसाठी बूस्टर डोस सुरू राहतील. तसेच, त्यास आणखी गती दिली जाईल, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
माहितीनुसार, 18+ वयोगटातील नागरिक खासगी लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन बूस्टर डोस (Booster Dose) घेऊ शकतील. 18 वर्षांवरील ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे आणि 9 महिने पूर्ण झाले आहेत त्यांना बूस्टर डोस मिळू शकेल.
आतापर्यंत, देशातील 15+ वयोगटांतील सुमारे 96% मुलांना किमान एक कोरोना लस मिळाली आहे तर 15+ वयोगटातील सुमारे 83% मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 2.4 कोटींहून अधिक बूस्टर डोस देखील आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि 60+ वयोगटांतील नागरिकांना देण्यात आले आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटातील 45% लोकांनी देखील पहिला डोस घेतला आहे.
6 मार्चपासून देशात 12-14 वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू आहे. 12-14 वर्षे वयोगटातील मुलांना Corbevax लस दिली जाईल.
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर 43 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या 5,21,573 वर पोहोचली आहे. भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11,492 वर आली आहे. देशातील कोरोना पॉझिटीव्हिटीचा रेट 0.03 टक्के आहे. गेल्या 24 तासांत देशात 1,213 रुग्ण बरे झाले आहेत.
1. https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉग इन करा
2. पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या बुकिंगसाठी वापरलेला मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
3. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल.
4. आता तुम्हाला पहिल्या दोन डोसचे तपशील, तसेच Precaution Dose टॅब दिसेल. तुम्हाला बूस्टर डोससाठी किती दिवस शिल्लक आहेत आणि देय तारीख देखील दिसेल.
5. त्यानंतर, अपॉईंटमेंट बुक करण्यासाठी 'शेड्युल Precaution Dose' टॅबवर क्लिक करा.
6. पिन कोड वापरून किंवा जिल्हा आणि राज्य निवडून लसीकरण केंद्र शोधा.
7. केंद्र आणि वेळेचा स्लॉट निवडा.
8. स्लॉट यशस्वीरित्या बुक केल्यावर, त्याचे तपशील स्क्रीनवर दिसतील.
9. अपॉइंटमेंटची पुष्टी म्हणून, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर VM-NHPSMS कडून एक मॅसेज प्राप्त होईल. एक OTP देखील पाठविला जाईल; तो लसीकरण केंद्रात दाखवायचे आहे.