भारतामधील कोरोनाची लाट ओसरत असतानाच चीनवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढावले आहे. ( Coronavirus returns in China ) कोरोना प्रतिबंधासाठी अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. विमानसेवा बंद स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. तर काही भागांमधील शाळा बंद केल्या आहेत.
कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे चीनच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम प्रांतातील अनेक शहरांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विमानसेवाही स्थगित केली असल्याचे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
२०२०मध्ये चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला. यानंतर संपूर्ण देशात टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करत कोरोनावर मात केल्याचा दावा चीनकडून करण्यात येत होता. देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठाही वेगाने झाला. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोना रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लानझू शहरात कोरोनाचे नवे सहा रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २९ झाली आहे. लानझू शहरात पूर्णपणे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. या शहराची लोकसंख्या चार लाख आहे. येथे आपत्तकालिन परिस्थिती वगळता नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
लानझू शहरात रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तत्काळ संपूर्ण शहरात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. नागरिकांना जीवनाश्यक वस्तू, औषधांचा पुरवठा केला जात आहे, असे स्थानिक प्रशासनाने म्हटलं आहे. २० ऑक्टोबर रोजी चीनमधील उत्तर भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यानंतर चीनमधील मंगोलियात ९ नवे रुग्ण आढळले. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.
कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने चीनमधील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी विमानसेवाही स्थगित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.