कोरोनाचा नवा AY.4.2 व्हेरियंट धोकादायक! | पुढारी

कोरोनाचा नवा AY.4.2 व्हेरियंट धोकादायक!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा नवीन व्हेरियंट AY.4.2 संबंधी देश सतर्क आहे. संसर्गाच्या या व्हेरियंटवर एक पथक तपास करीता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी मंगळवारी दिली. भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद ( ICMR ) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीस कंट्रोलच्या ( NDC ) पथकांवर विविध प्रकारचा अभ्यास तसेच विश्लेषणाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती मांडवीया यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) प्रक्रियेनुसार तांत्रिक समितीने ‘कोव्हॅक्सीन’ला मंजुरी दिली आहे. तर, इतर एका समितीची बैठक होणार आहे. याच बैठकीच्या आधारे कोव्हॅक्सीनला मंजुरी मिळेल, असे मांडवीया म्हणाले.

येत्या काळात देशाला कुठल्याही महारोगराईचा सामना करण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य ‘प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर’ करेल. योजनेवर ५ वर्षात ६४ हजार कोटी खर्च केले जाईल. ब्लॉक, जिल्हा, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रयोगशाळा उभारण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. योजनेनुसार एका जिल्ह्यात सरासरी ९० ते १०० कोटी रुपये खर्च केले जातील, असे मांडवीया यांनी स्पष्ट केले.

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधेसंबधी बोलताना ते म्हणाले की, कर्करोग, मधुमेह सारख्या रोगांवर उपचार तसेच प्राथमिक स्तरावर तपासासाठी दीड लाख आरोग्य तसेच कल्याण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात जवळपास ७९ हजारांहून अधिक केंद्राचे उदघाट्न करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या जागा जवळपास दुप्पट झाल्या आहेत, असे मांडवीया म्हणाले.

Back to top button