मोठी बातमी! राहुल गांधी लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र, मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्याने कारवाई

मोठी बातमी! राहुल गांधी लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र, मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरल्याने कारवाई

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेचे खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली आहे. राहुल गांधी यांना सूरत येथील न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांना दोषी ठरवल्याच्या तारखेपासून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड येथील खासदार आहेत. त्यांना गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आल्याचे लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की "राहुल गांधी नॅशनल हेराल्डच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीनावर आहेत. त्यांना संसदेतील सत्यापासून दूर जाण्याची सवय आहे. मला वाटते की राहुल गांधींना वाटते की ते संसद, कायदा आणि देश यांच्यापेक्षा मोठे आहेत. गांधी परिवार काहीही करू शकतात."

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सुरत जिल्हा न्यायालयाने काल २३ मार्च रोजी त्यांना दोषी ठरवत हा निर्णय दिला. २०१९ ला कर्नाटकातील एका सभेत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सूरत येथे गुन्हा दाखल झाला होता. दरम्‍यान, या प्रकरणी त्‍यांना १५ हजार रुपयांच्‍या जातमुचुकल्‍यावर जामीन मंजूर झाला असल्‍याची माहिती राहुल गांधी यांच्‍या वकिलांनी दिली होती.

काय होते प्रकरण ?

२०१९ मध्‍ये लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कर्नाटकमधील कोलार येथे राहुल गांधी यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी त्‍यांनी मोदी यांच्‍या नावावरुन आक्षेपार्ह विधान केले होते. यावेळी त्‍यांनी म्‍हटले होते की, देशातील सर्वच घोटाळ्यातील आरोपींचे नाव मोदी आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप मंत्री पूर्णेश मोदी यांनी केला होता. मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने गेल्या शुक्रवारी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर निकालासाठी २३ मार्चची तारीख निश्चित केली होती. कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news