Hingoli News: सेनगाव येथील काँग्रेसच्या आंदोलनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर

Hingoli News: सेनगाव येथील काँग्रेसच्या आंदोलनासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोदी सरकार विरोधात काँग्रेसच्या वतीने आज (दि.१५) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने स्वतःच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला (Hingoli News)  आहे.

राज्यात आणि देशात विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात विविध आंदोलने (Hingoli News)  केली जात आहेत. सेनगाव शहरात आज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाई व बेरोजगारीच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवर हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाला गर्दी जमवण्यासाठी सेनगाव तालुक्यातील काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या एका संस्था चालकाने या आंदोलनात चक्क महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामील केल्याचा प्रकार दिसून आला आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन संबंधित संस्था चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील सामान्य नागरिकांतून होऊ लागली आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पालक वर्गांकडून संस्थेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे संबंधित संस्था चालकावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलना दरम्यान एक तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, माजी आमदार भाऊराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, माजी शिक्षण सभापती संजय देशमुख आदीसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या आंदोलनानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्याकडे पोलीस व्हॅन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी गाडीतून नेण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news