हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट | पुढारी

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा; सेनगाव तालुक्यात कृषी विभागामार्फत परमिटवर महाबीज सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले होते. यानंतर रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, हे बियाणे बोगस निघाले त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हिवरखेडा येथील शेकऱ्याने आपल्या गट १८७ मध्ये महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले होते. हे पिक उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन शेतात पेरणी केली होती. आत्ता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील पाच ते सहा शेतकऱ्यांनी लावलेली महाबीजचे बियाणे उगवलेली नाही. शेतकरी कृषी विभागवर विश्वास ठेवून बियाणे खरेदी करतात. मात्र, हेच बियाणे बोगस निघत आहे. त्यामुळे आत्ता शेतकऱ्यांनी विश्वास ठेवायचा तर कोणावर असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जी कंपनी बोगस बियाणे विकेल त्या कंपनी व कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्यात येईल अशा ईशारा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला होता. यामुळे आता महाबीज कंपनी वर कार्यवाही होणार का याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

सेनगाव तालुक्यातील शेतकरी शरद निरगुडे, दत्तराव निरगुडे, वनिता उद्धव निरगुडे, एकनाथ मंठेकर, आत्माराम देसाई आणि रवि शिरसागर या शेतकऱ्यांच्या शेतात कृषी विभाग मार्फत महाबीज बियाणे पेरणी केली होती. मात्र बियाणे बोगस असल्यामुळे त्याची उगवन झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ८०% पेरणीचे कामे केली आहेत. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यावर बहूतांश शेतकऱ्यांनी ही कामे उरकली. एकीकडे मागील महिन्यात पाऊस लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. मात्र, या महिन्यात रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगवले नाही. यामुळे महाबीज कंपनीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवले आहे. या कंपनीवर तालुका कृषी विभागा मार्फत तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

आधीच शेतकरी निसर्गाच्या लहरीपनाला कंटाळून गेला आहे. माझ्या शेतात परमिटवर मिळालेली महाबीज १५८ या वानाचे बियाणे पेरले होते. परंतु हे पिक उगवलेच नाही. कृषी विभागाने व महाबीज कंपनीने शेतकऱ्यांची फसवनूक केली आहे. त्यामुळे महाबीज कंपनीवर तात्काळ कारवाई करून सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

– शिवशंकर निरगुडे, सेनगाव

Back to top button