हिंगोली : जिल्हयात ३.६ रिश्‍टर स्केलचा भूकंप, ७ मिनिटांच्या अंतराने दोनदा हादरे | पुढारी

हिंगोली : जिल्हयात ३.६ रिश्‍टर स्केलचा भूकंप, ७ मिनिटांच्या अंतराने दोनदा हादरे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हयात आज (शनिवार) सकाळी 7 वाजून 4 मिनीटांनी 3.6 रिश्‍टर स्केलचा भूकंप झाला आहे. अनेक गावांतून मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या पहिल्या धक्क्यानंतर पुन्हा 7 वाजून 12 मिनिटांनी पुन्हा हादरा बसला.

जिल्हयात मागील चार ते पाच वर्षांपासून भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अचानक जमिनीतून गडगडाटाचा आवाज येऊन जमीन हादरण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. सुदैवाने आजपर्यंत या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी वा वित्तहानी झाली नाही. मात्र आज (शनिवार) सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्यानंतर सात मिनिटांनी लगेचच सात वाजून १२ मिनिटांनी दुसरा आवाज झाला आहे.

जिल्हयातील पिंपळदरी, आमदरी, राजदरी, सोनवाडी, जामगव्हाण, कंजारा, पुर, काकडदाभा, फुलदाभा, जलालधाबा, नांदापूर, पांगरा शिंदे, कुरुंदा, सिंदगी, पोतरा, लक्ष्मणनाईकतांडा, तामटीतांडा, कुपटी, वापटी, हिंगणी, खेड यासह परिसरातील गावांमधून मोठा आवाज झाला, तर हिंगोली शहरापर्यंत याचे धक्के जाणवले आहेत. रिश्‍टर स्केलमध्ये या भुकंपाची तीव्रता 3.6 एवढी नोंदवली गेली आहे.

या भूकंपाची खोली भूगभा्रत 10 किलोमीटर एवढी असल्याचे भुकंप मापकामध्ये नोंद झाली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने दोन वेळा आवाज झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वेळोवेळी या आवाजाबद्दल माहिती दिल्यानंतरही त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासन देखील हतबल झाले आहे.
या परिसरात मागील सहा ते सात वर्षांपासून जमीनीमधून गुढ आवाज येत आहेत. मात्र हे आवाज नेमके कशामुळे येत आहेत याची माहिती अद्यापही गावकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हे गुढ आवाज आता गावकऱ्यांच्या् अंगवळणीच पडले आहेत. प्रशासनाने या भागात पाहणी करून आवाजाचे नेमके कारण शोधून त्याची माहिती गावकऱ्यांना द्यावी, असे बापूराव घोंगडे म्हणाले.

हेही वाचा : 

Back to top button