शहीद भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

शहीद भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर, पंजाबचे मुख्यमंत्री मान यांची घोषणा
शहीद भगतसिंग यांच्या बलिदान दिनी सरकारी सुट्टी जाहीर, पंजाबचे मुख्यमंत्री मान यांची घोषणा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शहीद भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त पंजाबच्या भगवंत मान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये आता २३ मार्चला शहीद भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी सुट्टी असणार आहे. मुख्यमंत्री मान यांनी ही घोषणा विधानसभेत केली. पंजाबमधील जनता भगतसिंग यांना त्यांच्या खटकर कलान या गावी जाऊन श्रद्धांजली अर्पण करू शकतील, अशी भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, पंजाब विधानसभेत शहीद-ए-आझम भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.

शहीद भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकांपैकी एक आहेत. भगवंत मान यांनी भगतसिंग यांना आपला आदर्श मानून खटकर कलान या गावात जाऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावेळी त्यांना राज्यपाल बनवारी लाल यांनी शपथ दिली. शपथ घेतल्यापासून मान हे भगतसिंग यांची विचारधारा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी भगतसिंग यांच्या स्मरणार्थ बसंती पगडी परिधान करून या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांनाही अशीच पगडी घालून येण्याचे आवाहन केले होते. संपूर्ण मंडपही बसंती रंगात सजवण्यात आला होता.

विधानसभेतील भाषणादरम्यान, मुख्यमंत्री मान यांनी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना हुसैनीवाला आणि खटकर कलान गावात जाऊन इतिहास अभ्यासण्याचे आवाहन केले. २३ मार्च रोजी शहीद भगतसिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुट्टी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांनी विरोध केला. त्यांनी २३ मार्चची सुट्टी अनावश्यक असल्याचे म्हणत मान यांच्यावर निशाणा साधला. यानंतर मुख्यमंत्री मान यांनी शहीद भगतसिंग यांचा जन्मदीन कधी आहे हे सांगू शकाल का? असा सवाल राजा वाडिंग यांना केला. मात्र याचे उत्तर काँग्रेस आमदारला देता आले नाही.

तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वत:च सांगितले की, भगतसिंग यांचा जन्मदीन हा २८ सप्टेंबरला असतो. भगतसिंग यांचा जन्मदीन नेत्यांच्या लक्षात नाही हे चांगले नाही. त्यामुळे आपल्या सरकारने आता नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मान यांनी केले.

शहीद-ए-आझम भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री भगवंत मान यांनी विधानसभेत मांडला, त्याला सभागृहाने मंजुरी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराजा रणजित सिंह यांचा पुतळाही विधानसभेत बसवला जाणार आहे. काँग्रेस आमदार प्रताप बाजवा यांनी महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती, असे सांगण्यात येत आहे.

पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री शपथविधी पार पडताच ॲक़्शन मोडमध्ये आले आहेत. भगवंत मान यांनी यापूर्वीच पंजाबमध्ये अँटी करप्शन हेल्पलाइन सुरू केल्याचा दावा केला आहे. भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. आपण पंजाबला भ्रष्टाचारमुक्त करू, असा दावा मान यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news