Opposition walkout : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांचा लोकसभेत सभात्याग | पुढारी

Opposition walkout : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधकांचा लोकसभेत सभात्याग

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत मोठा गदारोळ केला. या विषयावर चर्चा घेण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळून लावल्यानंतर काँग्रेस, तृणमूलसहित इतर विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करीत सभात्याग ( Opposition walkout ) केला.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल, डीझेल तसेच घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात वाढ केली आहे. या दरवाढीचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर काँग्रेसचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी सदर मुद्दा उपस्थित केला.

Opposition walkout : दरवाढ त्‍वरित मागे घ्‍या

विधानसभा निवडणुका संपल्यावर इंधन दरवाढ होईल, असा संशय विरोधी पक्षांकडून आधीच व्यक्त करण्यात आला होता. तो खरा ठरला आहे. महागाईने होरपळत असलेल्या जनतेला दरवाढीमुळे आणखी त्रास होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय, द्रमुकचे टी. आर. बालू यांनीदेखील या विषयावर चर्चा घेत दरवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली. अखेर गदारोळातच काँग्रेस, तृणमूल, राष्ट्रवादी, द्रमुक तसेच डाव्या पक्षांनी सभात्याग केला.

अखिलेश, आझम खान यांचा खासदारकीचा राजीनामा…

दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत करहल मतदारसंघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गत लोकसभा निवडणुकीवेळी अखिलेश यांनी आझमगड मतदार संघातून विजय मिळवला होता. अखिलेश आमदारकीचा राजीनामा देत खासदारकी कायम ठेवतील, मानले जात होते, मात्र राज्याच्या राजकारणाला जास्त प्राधान्य देण्याचे ठरवत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचे मानले जात आहे. अखिलेश यांचे सहकारी आझम खान यांनीदेखील खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आझम खान हे २०१९ मध्ये रामपूरमधून निवडून आले होते.

हेही वाचलं का?

 

 

Back to top button