Karnataka Election Results | बसवराज बोम्मई यांच्याकडून कर्नाटकातील पराभव मान्य, काँग्रेसचे विजयाबद्दल केले अभिनंदन

Karnataka Election Results | बसवराज बोम्मई यांच्याकडून कर्नाटकातील पराभव मान्य, काँग्रेसचे विजयाबद्दल केले अभिनंदन

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकात काँग्रेसने १२८ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर भाजप ६७ आणि जेडीएस २२ जागांवर आघाडीवर आहे. या निकालावर भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपचा पराभव मान्य केला आहे. त्यांनी या विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदनही केले आहे. "आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकलो नाही. संपूर्ण निकाल आल्यानंतर आम्ही तपशीलवार त्याचे विश्लेषण करू. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही केवळ या निकालाचे विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर आम्ही कुठे कमी पडलो हेदेखील पाहणार आहोत." असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. (Karnataka Election Results)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी सकाळी सुरू होताच बोम्मई यांनी हुबळी येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. ANI वृत्तसंस्थेने बोम्मई हनुमान मंदिरात प्रार्थना करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ते भगवान हनुमानाचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा आणि आरती करताना दिसतात. निवडणूक मतदानादिवशी म्हणजेच १० मे रोजी त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते.

"कर्नाटकसाठी आजचा दिवस मोठा आहे. कारण आज जनतेचा कौल येणार आहे. मला विश्वास आहे की भाजप पूर्ण बहुमताने विजयी होईल आणि एक स्थिर सरकार देईल," असे बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते.

निकालाच्या आधी शुक्रवारीही बोम्मई यांनी भाजप पूर्ण बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. निवडणूकपूर्व चाचण्या आणि एक्झिट पोलमध्ये काँग्रेस हा १०० ते ११० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे; तर काही एक्झिट पोलनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देऊ केले आहे. कुणाचे भाकीत खरे, हे आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. राज्यातील २२४ विधानसभा मतदारसंघांत २,६१५ उमेदवार रिंगणात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत १८७ उमेदवार लढत आहेत. (Karnataka Election Results 2023)

जेडीएसला त्रिशंकू निकालाची अपेक्षा होती. कारण ते सरकार स्थापनेत किंगमेकरची भूमिका बजावू शकतील. दरम्यान, मतमोजणीच्या ताज्या ट्रेंडनुसार काँग्रेस पक्ष १२८ जागांवर आघाडीवर आहे. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ११३ आहे. १९८५ पासून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर विद्यमान सरकार कर्नाटकात पुन्हा सत्तेवर येत नाही, असा इथला राजकीय इतिहास आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news