Karnataka Election Results 2023 : बेळगाव दक्षिणमधून भाजपचे आमदार अभय पाटील पुन्हा विजयी | पुढारी

Karnataka Election Results 2023 : बेळगाव दक्षिणमधून भाजपचे आमदार अभय पाटील पुन्हा विजयी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपचे आमदार अभय पाटील पुन्हा विजयी झाले आहेत. अभय पाटील हे 11 हजार 762 इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना 76,249 मते मिळाली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना 64,487 मते मिळाली आहेत.

धारवाडमधून काँग्रेसचे विनय कुलकर्णी विजयी

धारवाड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी विजयी झाले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार आनंद न्यामगौडा यांचा त्यांनी पराभव केला. विशेष म्हणजे कुलकर्णी यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आल्याने त्यांनी या मतदारसंघात एकही दिवस प्रचार केला नव्हता.

विनय कुलकर्णी यांच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. खून प्रकरणी काही महिने ते हिंडलगा कारागृहात होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना धारवाड जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून देखील जिल्हा बंदीमुळे विनय कुलकर्णी यांना एक दिवसही प्रचार केला नाही. त्यांची पत्नी, परिवाराने व कार्यकर्त्यांनी प्रचार कार्य राबविले. त्यामुळे विनय कुलकर्णी हे निवडून येणार याकडे राज्याचे लक्ष होते. पण एक दिवसही प्रचार न करता विनय कुलकर्णी हे विजयी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटकात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. यामुळे भाजपला धक्का देत काँग्रेसने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दुपारी १२ वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने १२१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ७२, जेडीएस २४ जागांवर आणि अपक्षांनी ५ जागांवर आघाडी घेतली आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११३ आहे. काँग्रेस १२० पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि स्वबळावर सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button