विकासकामांना ब्रेक
विकासकामांना ब्रेक

काळू धरणाच्या पहिल्या टप्प्यात ३३६ कोटींचा निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन जिल्ह्याला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या काळू धरणाच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने ३३६ कोटी निधी भूसंपादनासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कल्याण मंडणगड-कुशिवली धरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन, ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, ठाणेचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, खा. डॉ श्रीकांत शिंदे, आ. रवींद्र फाटक यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील काळू धरणाच्या उभारणीसाठी मुरबाड तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीतील १८ गावे आणि २३ पाडय़ांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. वन विभागाची ९९९ हेक्टर जमीनही या धरणामुळे पाण्याखाली जाणार आहे. या सर्वं जमिनीच्या भुसंपादनासाठी 'एमएमआरडीए'ने पहिल्या टप्प्यात ३३६ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत. ज्यायोगे भूसंपादन विहित वेळेत पूर्ण होऊन धरणाच्या कामाला गती येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काळू धरणातून ११४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार

काळू धरणातून ११४० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाच्या उभारणीमुळे ठाणे, भिवंडी निजामपूर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या शहरांची भविष्यातील पाण्याची तहान भागवली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी या धरणाच्या जमीन अधिग्रहण प्रक्रिया तातडीने पूर्ण करून हे धरण वर्षभरात पूर्ण करावे, असे निर्देश दिले. या १० एमएलडी क्षमतेच्या धरणामुळे या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

'एमआयडीसी'च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दाब वाढवण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीला केली. येत्या काही दिवसात हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी या बैठकीत स्पष्ट केले. जांभूळ धरणातून शहाड शहराला पाणीपुरवठा होतो, या पाणीपुरवठा वाहिन्या अतिशय जीर्ण झाल्या असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होते, या वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी यावेळी केली. हा प्रश्न तातडीने मार्गी लावून पाणीपुरवठा नियमित करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचलंत का? 

logo
Pudhari News
pudhari.news