Chandrayan 3 : प्रतिक्षा आज सायंकाळची, महाविश्वविक्रमाची!

Chandrayan 3 : प्रतिक्षा आज सायंकाळची, महाविश्वविक्रमाची!

भारताने दक्षिण ध्रुवच का निवडला?

आज सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे… भारताचे चांद्रयान-3 (Chandrayan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि त्याचवेळी खर्‍या अर्थाने भारत विश्वविक्रमादित्य ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ही सर्वात आव्हानात्मक मोहीम आता अंतिम टप्प्यात आली असून, सर्वांना प्रतीक्षा आहे ती, यशस्वी, सफल लँडिंगची! चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग कसे असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि म्हणूनच आजची सायंकाळ विशेष उत्कंठापूर्ण असणार आहे. सायंकाळची 6 वाजून 4 मिनिटे आणि सार्‍या नजरा सॉफ्ट लँडिंगवर! आजची सायंकाळ विशेष रम्य ठरावी, हीच सदिच्छा..!

पृथ्वीवरून चंद्र जितका सपाट दिसतो, तो तितका अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आहे. चंद्राच्या भूभागावर मोठमोठाले खड्डे असून, त्यांना विवर असे संबोधले जाते. यातील काही विवर इतके प्रचंड मोठे आहेत की, त्या क्रेटरमध्येही आणखी बरेच क्रेटर सामावलेले आहेत आणि याचमुळे सॉफ्ट लँडिंग करणे आव्हानात्मक असते.

चंद्रावरील दक्षिण ध्रुव सर्वात कठीण भूभागापैकी एक मानला जातो. येथे लँडिंग अजिबात सहजसोपे असत नाही आणि म्हणूनच इस्रो यावेळी प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकत आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी पिनपॉईंट नेव्हिगेशन गाईड, फ्लाईट डायनामिक्स, सपाट जागेची अचूक माहिती, योग्यवेळी थ्रस्टर कार्यान्वित होणे आणि योग्यवेळी त्याचा वेग कमी होणे अतिशय महत्त्वाचे असते. चंद्रावर कोणतेही यान उतरत असते, त्यावेळी ते एका अर्थाने पडत असते.

ज्यावेळी लँडर वेगळा होतो, त्यावेळी तो चंद्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागतो. यादरम्यान खाली जाण्याची व योग्य दिशेने जाण्याची निर्धारित दिशा नियंत्रित असावी लागते. सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग प्रतिसेकंद तीन मीटरपर्यंत कमी करण्याची गरज असते. या वेगासाठी थ्रस्टर इंजिन सुरू केले जाते. आतापर्यंत चंद्रावर जे यान पाठवले गेले, ते उत्तर किंवा मध्य ध्रुवाच्या रोखाने होते. या भूभागातील जागा बर्‍यापैकी सपाट आहे आणि सूर्याचा प्रकाशही उत्तम असतो. दक्षिण ध्रुव मात्र चंद्रावरील अशी जागा आहे, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. याचबरोबर या भूभागात मोठमोठाले दगड, मोठे क्रेटर आहेत. येथील सिग्नलदेखील कमकुवत असतो. त्यामुळेच, येथे सॉफ्ट लँडिंग अधिक आव्हानात्मक, अधिक कठीण ठरते.

लँडिंगचा निर्णय दोन तासांपूर्वी…

लँडिंगबाबत शेवटचा निर्णय लँडिंगच्या दोन तासांआधी घेतला जाणार आहे. यानात लावण्यात आलेला कॅमेरा मोठमोठाले दगड, खोल खड्डे पाहून सुरक्षित लँडिंग करवण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल.

असे असतील लँडिंग मॉड्युल उतरवण्याचे टप्पे…

पहिला टप्पा : या टप्प्यात यान 30 कि.मी. अंतरावरून साडेसात कि.मी. अंतरावर आणले जाईल. यासाठी 690 सेकंदांचा वेळ लागेल.
दुसरा टप्पा : या टप्प्यात अंतर 6.8 कि.मी. अंतरावर आणले जाईल. यावेळी यानाचा वेग प्रतिसेकंद 350 मीटर इतका अल्प असेल.
तिसरा टप्पा : यानाला चंद्रापासून 800 मीटर उंचीपर्यंत आणले जाईल. येथून दोन थ्रस्टर इंजिन त्याला उतरवतील. या टप्प्यात यानाचा वेग आणखी कमी केला जाईल.
चौथा टप्पा : या टप्प्यात यानाला 150 मीटर्सच्या आसपास आणले जाईल. याला व्हर्टिकल डिसेंट असे म्हणतात. याचा अर्थ होतो उभे लँडिंग.
पाचवा टप्पा : या टप्प्यात यानात लागलेले सेन्सर व कॅमेर्‍याकडून मिळणार्‍या लाईव्ह इनपूटला पूर्वीच स्टोअर केल्या गेलेल्या रेफरन्स डेटाशी जोडले जाईल. या डेटामध्ये 3,900 पेक्षा अधिक छायाचित्रे समाविष्ट आहेत, जेथे चांद्रयान-3 उतरवण्याची जागा निश्चित केली गेली आहे. यात तुलना केल्यानंतर लँडिंगची जागा योग्य आहे की नाही, याचा निर्णय घेता येऊ शकेल. जर लँडिंगसाठी जागा योग्य नाही, असे वाटले तर अशा परिस्थितीत त्याला उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवले जाईल. या टप्प्यात यान चंद्राच्या भूपृष्ठापासून 60 मीटरपर्यंत आणले जाईल.
सहावा टप्पा : हा या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा शेवटचा टप्पा असेल. यावेळी लँडरचा वेग प्रतिसेकंद 1 ते 2 मीटर इतकाच असणार आहे. यामध्ये लँडरला थेट चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल आणि येथेच भारत खर्‍या अर्थाने विश्वविक्रमादित्य होईल.

चंद्रावर पोहोचताच असा बनणार 'अशोक स्तंभ!'

लँडिंगदरम्यान चांद्रयान-3 आज दोन विक्रम प्रस्थापित करेल. यातील पहिला विक्रम हा असेल की, सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया व चीननंतर भारत असा पराक्रम गाजवणारा चौथा देश ठरेल. याशिवाय, दुसरा विक्रम हा असेल, ज्यावेळी चांद्रयान-3 चंद्रावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारेल.

या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडरवरून रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरवले जाणार आहे. यानंतर इस्रो कमांड देईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ साकारले जाईल. अशारीतीने इस्रो चंद्रावर भारताची मोहर उमटवणार आहे.

मोहिम यशस्वी करणारी उपकरणे

लँडर

लँडर विक्रम मुख्य उपकरण आहे. उपकरणात रेट्रोरिफ्लेक्टर समाविष्ट असून, त्या माध्यमातून चंद्रावरून पृथ्वीवरील रेंजिंगची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहील. सिस्मोग्राफ भूगर्भीय प्रक्रिया समजून घेण्यात मदत करेल. चौथे उपकरण सरफेस थर्मोफिजिकल परीक्षण हे आहे. पटलावरील वरच्या आवरणातील रिगोलिथ तापीय परिचालकता यात मोजली जाईल.

रोव्हर

रोव्हर प्रज्ञान हे विक्रम लँडरच्या आत ठेवले गेले आहे. यशस्वी लँडिंगनंतर रोव्हर चंद्राच्या भूभागावर उतरवले जाईल. यात अल्फा पार्टिकल एक्साईट स्पेक्ट्रोमीटर एपीईएस व लेजर इंड्यूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी अशी दोन उपकरणे आहेत. चंद्राच्या भूभागावरील घटक शोधणे, खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती पुरवणे, हे त्याचे मुख्य कार्य असेल.

'नासा' आणि 'एसा'चे मोहिमेवर लक्ष

चांद्रयान 3 ही जरी भारताची मोहीम असली, तरी सार्‍या जगाचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. खासकरून नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी अर्थात एसा या दोन संस्था या मोहिमेवर नजर ठेवून आहेत. चांद्रयानाकडून येणार्‍या संदेशाचे ग्रहण करणे व त्याचे विश्लेषण करणे याकामात एसाच्या जगाच्या विविध ठिकाणी असलेल्या दुर्बिणींच्या माध्यमातून सहकार्य होणार आहे. तसेच नासाही या मोहिमेवर लक्ष ठेवून आहे. नासा व एसा या दोन्ही संस्थांचे उपग्रह अंतराळात असून, त्यांच्या माध्यमातूनही या मोहिमेवर लक्ष ठेवले जात आहे.

2024 मध्ये अमेरिकेची चांद्रमोहीम होणार असून, त्यात मानव पुन्हा एकदा चंद्रावर उतरणार आहे. नासाची ही मोहीमदेखील चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात असेल. त्यामुळे भारताचे चांद्रयान तेथून काय माहिती पाठवते, याकडे अमेरिकेचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेने त्यामुळेच भारताला नासाच्या या चांद्रमोहिमेत सहभागी करून घेतले आहे.

'चांद्रयान-3' मोहिमेतील घटनाक्रम…

6 जुलै : इस्रोने मिशन चांद्रयान-3 श्रीहरिकोटा येथून 14 जुलैला रवाना होईल असे जाहीर केले.
7 जुलै : सर्व इलेक्ट्रिकल चाचण्या यशस्वी.
11 जुलै : सर्व लाँचिंग प्रक्षेपणाची रिहर्सल घेण्यात आली.
14 जुलै : एलव्हीएम 3 एम 4 चांद्रयान-3 मोहिमेवर रवाना.
15 जुलै : कक्षा वाढवण्याचा पहिला टप्पा सर.
17 जुलै : दुसर्‍या कक्षेत यशस्वी प्रवेश.
25 जुलै : चांद्रयान-3 चौथ्या कक्षेत पोहोचले.
1 ऑगस्ट : यानाची चंद्राच्या कक्षेजवळ झेप.
5 ऑगस्ट : यानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
6 ऑगस्ट : कक्षेत पोहोचल्यानंतर हळूहळू खाली येण्यास सुरुवात.
14 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या भूपृष्ठानजीक पोहोचले.
16 ऑगस्ट : चांद्रयानाचा पाचव्या व शेवटच्या कक्षेत प्रवेश.
18 ऑगस्ट : डिबुस्टिंग ऑपरेशनची सांगता.
23 ऑगस्ट : सारे काही नियोजनाप्रमाणे पार पडल्यानंतर 30 कि.मी. अंतर कापून यान टचडाऊनसाठी सज्ज राहणार!

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news