पुणे ; पुढारी वृत्तसेवा
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात राष्ट्रवादीला सरकार स्थापण्याची ऑफर दिली होती, असे शरद पवार कितीही सांगत असले तरी, पवारांचा आजवरचा इतिहास खरे बोलण्याचा नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचेही ते म्हणाले.
'नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिली होती, हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे. अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांकडे नाही. त्यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही.' मोदी आणि पवार यांचे नेमके काय बोलणे झाले, हे सांगण्याइतपत मी मोठा नेता नाही, असेही पाटील म्हणाले.
राज्यात गेले दोन दिवस जे घडत आहे, ते आघाडीतील घटक पक्षांमध्ये बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी चालू झालेल्या चढाओढीचा परिणाम आहे. तथापि, गेल्या 26 महिन्यांत राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल, असे त्यांनी सांगितले.
भाजप आणि शिवसेनेत अंतर वाढविल्याची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल, तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला पाटील यांनी लगावला.सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहून दमबाजीचाही प्रयत्न केला; पण राज्यपालांनी कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा ज्या नेत्याच्या सल्ल्याने हे आघाडी सरकार चालते, त्या रिमोट कंट्रोलने फोन करून राष्ट्रपती राजवट लागेल, अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे अध्यक्ष निवड न करता अधिवेशन गुंडाळण्यात आले, असा आरोपही पाटील यांनी केला.
ते म्हणाले, 'विधिमंडळाच्या पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशात सामान्य लोकांच्या हिताचे एकही काम सरकारने केले नाही. केवळ 32 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे आणि घाईघाईत 19 विधेयके मंजूर करून घेणे हे काम या सरकारने केले.'
आघाडी सरकारचा एक मोठा नेता प्रचारासाठी उपलब्ध नसल्यामुळेच, महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी आरक्षणाचे केवळ निमित्त आहे. नितेश राणे कारवाईप्रकरणी बोलताना पाटील म्हणाले, पोलिसांवर कोण दबाव टाकतंय, तिथल्या एसपींना कोण फोन करतंय? हे सर्वांना ठाऊक आहे; पण नारायण राणे या सगळ्यांना पुरून उरतील, असेही पाटील म्हणाले.
'भाजपने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला ऑफर दिली, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगत असले तरी ते अर्धसत्य सांगत आहेत, त्यांनी सत्य सांगावे,' असे मत भाजप नेते व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. 'सर्व काही ठरले होते. मात्र, पवारांनी शब्द फिरवला,' असेही त्यांनी सांगितले.