न्यूयॉर्क : निसर्गाचे नियम कधी कधी अपवादानेही सिद्ध होत असतात. स्त्रीदेहात एकच गर्भाशय असते हा नियम झाला. मात्र, कधी कधी त्यालाही अपवाद पाहायला मिळतात. अशीच एक महिला अमेरिकेत आहे. तिच्या शरीरात दोन गर्भाशये आहेत आणि या दोन्ही गर्भाशयांमध्ये गर्भधारणाही झाली.
अमेरिकेत नेब्रास्कामध्ये राहणार्या मेगन फिफ्स हिच्या शरीरात अशी दोन गर्भाशये आहेत. त्याला वैद्यकीय भाषेत 'यूट्रिन डिडेल्फिस' असे म्हटले जाते. डॉक्टरांना आधीच याबाबतची माहिती असते; पण या दोन्ही गर्भाशयात एकाच वेळी गर्भ राहिल्याचे पाहून डॉक्टरही चकीत झाले आहेत. मेगनला आधीची दोन मुलं आहेत.
ही दोन्ही मुलं तिच्या उजव्या गर्भाशयातून जन्मलेली होती. त्यामुळे आपले डावे गर्भाशय काम करीत नाही, असेच तिला वाटत होते. मात्र, तिसर्या प्रेग्नन्सीमध्ये तिला समस्या जाणवली. तिने याबाबत डॉक्टरांना विचारले. तेव्हा तपासणीत असे दिसून आले की तिच्या दोन्ही गर्भाशयात गर्भाची वाढ होत आहे.
प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यानंतर तिची प्रसूती होऊन जुळ्या मुलींचा जन्म झाला. त्यावेळी त्यांचे वजन 453 ग्रॅमपेक्षाही कमी होते. दुर्दैवाने बारा दिवसांमध्येच तिच्या पहिल्या मुलीचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी रिसला 45 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले आणि ती वाचली.