पुढारी ऑनलाईन : मुंबई, ठाणे, पुण्यासह, कोकण घाट क्षेत्रात पुढच्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने शुक्रवारी (दि.१६) पुणे जिल्ह्याला 'येलो अलर्ट' चा इशारा दिला असून, प्रामुख्याने घाटांच्या बाजूला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहरातील अनेक भागात गेल्या 24 तासांत शुक्रवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाऊस झाला. त्यात चिंचवड (23 मिमी), शिवाजीनगर आणि पाषाण (14.5 मिमी), वडगावशेरी (13 मिमी), कोरेगाव पार्क (11 मिमी) आणि मगरपट्टा (8) मिमी), लवासामध्ये (104 मिमी), लोणावळा (101.5 मिमी), गिरीवन (85 मिमी), निमगिरी (77 मिमी) आणि माळीण (54.5 मिमी) पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे जिल्ह्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र सध्या अरबी समुद्रातून वाहणाऱ्या जोरदार पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली आला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलावा भारित पश्चिमेकडील वाऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रावर परिणाम होत राहील. शनिवारपर्यंत पावसाची मुसळधार कायम राहील. तसेच पुढील दोन दिवसात शहरातील तापमान 26 अंश सेल्सिअस ते 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.