World Ozone Day : ...म्हणून साजरा केला जातो 'जागतिक ओझोन दिन' | पुढारी

World Ozone Day : ...म्हणून साजरा केला जातो 'जागतिक ओझोन दिन'

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जागतिक ओझोन दिन. (World Ozone Day) दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन  साजरा केला जातो. याच दिनानिमित्त आपण आज हा दिवस का साजरा केला जातो? यंदाची थीम काय आहे? ओझोन स्तर म्हणजे काय? आदी बाबी पाहणार आहोत.

जागतिक ओझोन दिन

World Ozone Day : जागतिक ओझोन दिवस 2022 थीम 

दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. दरवर्षी एक थीम ठरवली जाते. या थीमनूसार वर्षभर ओझोनसाठी पर्यावरण पूरक काम केले जाते.  यावर्षीची थीम ही “मॉन्ट्रियल प्रोटोकॉल @ 35: पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक सहकार्य” अशी आहे. (Montreal Protocol@35: global cooperation protecting life on earth.)

1970 च्या उत्तरार्धात ओझोनच्या थराला छिद्र असल्याचा दावा काही शास्त्रज्ञांनी केला. यानंतर, 80 च्या दशकात जगभरातील अनेक सरकारांनी या समस्येवर विचार करण्यास सुरुवात केली. 19 डिसेंबर 1994 रोजी  संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA-United Nations General Assembly) 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठीचा दिवस म्हणून घोषित केला. 16 सप्टेंबर 1987 रोजी, युनायटेड नेशन्स आणि इतर 45 देशांनी ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली. पहिल्यांदा १९९५ साली १६ सप्टेंबर रोजी ओझोन दिन साजरा केला.

World Ozone Day : जागतिक ओझोन दिनाचे महत्त्व

ओझोन थर हा स्ट्रॅटोस्फियरचा थर आहे जो पृथ्वीला सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावापासून संरक्षण करतो. वातावरणात ओझोनमुळे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण होते.  मानवाच्या अविवेकी कृतीमुळे, वातावरणात सोडले जाणारे क्लोरीन आणि ब्रोमाइन अणू यांसारखी रसायने ओझोन थराच्या ऱ्हासास मुख्यत्वे जबाबदार ठरत असतात.  दिवसेंदिवस ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. ओझोन पूर्णपणे संपुष्टात आल्यास सजीवांना आणि पृथ्वीला ते हानीकारक ठरू शकते.  आपण अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आलो तर त्वचेच्या कर्करोगासारखे घातक रोग होऊ शकतात.

काय आहे ओझोन थर ? (Ozone layer)

बऱ्याचजणांना ओझोन थर म्हणजे नेमके काय याबाबत बरेच प्रश्न पडत असतात. ओझोनचा थर हा ऑक्सिजनच्या तीन अणू असलेला वायू. आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर आहे, जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करण्याचे काम करतो. पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची ( O3ची ) घनता जास्त असलेल्या २० ते ३० किमी उंचीवरील हवेच्या थराला ओझोनचा पट्टा म्हणतात. फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स फॅब्री आणि हॅन्‍री बुइसन यांनी  १९१३ मध्ये ओझोन थराचा शोध लावला. १९३० मध्ये  भौतिकशास्त्रज्ञ सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया शोधून काढली.

World Ozone Day : यूएनच्या सहा अधिकृत भाषांमध्ये थीम

Arabic

مرور 35 عاماً على توقيع بروتوكول مونتريال: تعاون
عالمي لحماية الحياة على الأرض
Chinese

蒙特利尔议定书35周年:全球合作以保护地球上的生命

English

Montreal Protocol@35: global cooperation protecting life on earth

French

Protocole de Montréal@35 : une coopération mondiale pour protéger la vie sur terre

Russian

Монреальский протокол@35: мировое сотрудничество для защиты жизни на Земле

Spanish

Protocolo de Montreal@35: cooperación global para proteger la vida en la tierra

सध्या जागतिक हवामान बदल व उष्णतावाढ दिवसेंदिवस वाढू लागले आहे. हे आपल्या पृथ्वीसाठी खूप घातक आहे. ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी सक्रिय प्रयत्नांची गरज आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button