Mumbai rains : आयएमडीकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी, १५ सप्टेंबरला मुसळधार पावासाची शक्यता | पुढारी

Mumbai rains : आयएमडीकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी, १५ सप्टेंबरला मुसळधार पावासाची शक्यता

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आयएमडीने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारीकरून 15 सप्टेंबरला मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ऑरेंज अलर्ट हा मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता दर्शवतो. तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुसळधार पावसाने मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी बहुतांशी ठिकाणी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. रविवारी पुणे शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला.

दरम्यान, मुंबईत गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने अंधेरी सबवे परिसर, साकीनाका परिसर येथे पाणी साचलं. यामुळे वाहन चालक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली. मुंबई उपनगरातील सांताक्रूझ, कांदिवली आणि अंधेरीत मुसळधार पाऊस झाला.

आयएमडीच्या प्रादेशिक हवामान केंद्राने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या अहवालानुसार, गुरुवारी (दि. 15) पावसाच्या हालचालींमध्ये वाढ दर्शवत आहे. त्यामुळे या दिवसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी हवामानाच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मंगळवारपर्यंत, मध्य प्रदेशच्या मध्यवर्ती भागावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील 24 तासांत ते मध्य प्रदेशात जवळजवळ वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तथापि, सतर्कता कायम राहील. बुधवारी पुन्हा पुनरावलोकन केले जाईल, असेही आयएमडीच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण साठा मंगळवारी गरजेच्या ९९ टक्क्यांहून अधिक झाला. मंगळवारी सकाळी एकूण 14.37 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. सात तलाव 100 टक्के क्षमतेने भरण्यासाठी एकूण पाणीसाठा 14.47 लाख दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

Back to top button