पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही खूप सारं अन्न खा अथवा न खा, पण तुमचं वजन वाढत राहतं. कधी कधी तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयन करूनही वजन वाढत राहतं. आपल्याला स्वत:ला असं वाटत राहतं की, आपलं वजन अचानक वाढलं आहे. (Cause Of Weight Gain ) मग, तुम्ही डाएटच्या मागे लागता, जिमला जाता आणि पुन्हा ब्रेक घेता अथवा पुरेसा आहार घेणे बंद करता. काही वेळी तुम्ही संभ्रमात राहता की, अमूक एक पदार्थ खाऊ की नको. खाल्लं तर वजन वाढेल का? मग, इच्छा असतानाही तुम्ही ते टाळता. पण, वजन वाढण्यामागे तुम्ही कारणे शोधली आहेत का? (Cause Of Weight Gain )
अपूर्ण झोप – शांत आणि पूर्ण झोप होणे, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. तुम्हाला कोणत्याही गोळ्या-औषधे न घेता झोप लागते, हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे. अपूर्ण झोपेमुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवाही येऊ शकतो, ज्यामुळे तुमची शारीरिक हालचाल मंदावते. कोणतेही काम करण्यास कंटाळा येतो. मोबाईल, टीव्ही मुळे रात्री जागरण होतं. मुले तर लवकर झोपत नाहीत. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत राहते. मधुमेह असणाऱ्यांना याचे अनुभव येत असावेत. नैसर्गिकरित्या तुम्हाला झोप आली की, तुम्ही झोपलं पाहिजे आणि सकाळी उठलं पाहिजे. सलग झोप लागत नसल्यास नंतर ती झोप तुम्ही भरून काढता येते. पण झोपचं लागत नाही, असा त्रास सुरु राहिला तर वजन वाढतं. शिवाय मधुमेहींसाठी तर ते अधिक धोकादायक ठरतं.
सकस आहार न घेणे – दगदगीच्या जीवनात सकस आहार घेणं खूप महत्वाचं ठरतं. आहारात घेतलेले अन्न सकस असले पाहिजे. अन्नातून मिळणाऱ्या पोषण तत्वातून ऊर्जा मिळत असते. प्रथिने, जीवनसत्त्व, फॅट्स, कॅल्शियम, खनिजद्रव्ये, फायबर असा आहार घेणं गरजेचं आहे. काही लोकांकडून थोडेसे वजन वाढले की, अन्न कमी केलं जातं. पण, तसं करण्यापेक्षा सकस आहारा घेण्याकडे लक्ष द्यावं. अंडी, मास, मासे, फळे, हिरव्या भाज्या, दूध, तूप, मोड आलेली कडधान्ये, बाजरी, ज्वारीची भाकरी अशा पदार्थांच्या अन्नामध्ये समावेश करावा.
जंक फूड – आज फॅशनच्या नावाखाली मोठमोठ्या रेस्टॉरंमध्ये जाऊन फास्ट फूड खाल्लं जातं. पार्टी असो सोहळा जंक फूड मागवलं जातं. आजच्या तरुणाईला तर सकाळी नाश्त्याला भाजी भाकरी नको असते. कॉलेजमध्ये जाऊन पुन्हा फास्ट फूड मागवलं जातं. नोकरदारवर्गदेखील यातून सुटलेला नाही. पण सकाळी बाहेर पडतानाचा घरातील उपीट, पोहे, इडली, आंबोळी, सुजी, शिरा असा नाश्ता करावाचं. आजदेखील ग्रामीण भागात लोक भाजी भाकरी भात खाऊनचं बाहेर पडतात. तुम्हाला माहितीये का, कोणते जंक फूड वजन वाढवतात ? तर व्हाईट ब्रेड, साखरेचे पदार्थ, आईस्क्रीम, चिप्स, केक, कुकीज, नमकीन, पेस्ट्रीज, सर्व प्रकारचे शुगर ड्रिंक्स हे सर्वात अधिक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात.
अनुवंशिकता – वजन वाढण्यामागे अनुवंशिकता हा एक भाग आहे. असं म्हणतात की, ज्या मुलांचे आई-वडील लठ्ठ असतात, त्यांची मुलेही लठ्ठ होतात, असे म्हटले जाते. अनुवंशिकतेत बदल आपण करू शकत नाही. पण निरोगी जीवनशैली अवलंबून नक्कीच बदल करता येतो.
ताणतणाव – ताण वाढलेल्या वजनाला कारणीभूत ठरु शकतो. अनेकजण इतके ताणतणावात असतात की, तहान भूक लागलेलीही त्यांना कळत नाही. परिणामी, याचे दुष्परिणाम होऊन काही वेळा वजन वाढते. तर याऊलट काही लोक तणावात असतील तर खूप जास्त खातात. त्यामुळेही वजन वाढू शकते. त्यामुळे स्वत:वर नियंत्रण ठेवून आपला वेळ चांगल्या लोकांसोबत घालवणे, छंद जोपासणे, फिरायला जाणे, खेळ खेळणे आणि योग्य आहार घ्यायला हवे.
शारीरिक हालचाल नसणे – तासनतास बैठे काम करणाऱ्यांना लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. शारीरिक हालचाल होत नसल्याने कॅलरीज बर्न होत नाहीत. पायी चालणे, दोरीवरच्या उड्या मारणे, घरच्या घरी कवायतीचे प्रकार करणे, जिमला देखील जाऊ शकता. जमल्यास योगासनेदेखील करू शकता. पण, एका जागी न बसता, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करायला हवा.