पुढारी ऑनलाईन डेस्क : चहा भारतीयांचे आवडते पेय आहे. देशातील बहुतेक घरात चहाच्या सेवनाने दिवसाची सुरूवात होत असते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्वच नागरिकांना चहा हवा असतो. एखाद्या वेळेस चहा मिळाला नाहीतर तो दिवस कंटाळवाना होऊन जातो. याच्या उलट जर कामातून दमून-भागून घरी आल्यावर जर चहाचा एक घोट मिळाला तर लगेच तरतरीपणा जाणवतो. सकाळी सकाळी वृत्तपत्र वाचण्याची सुरुवात चहा घेऊनच होते. प्रत्येक वेळी चहासाठी वापरलेली चहा पावडर चहा बनवून झाल्यानंतर फेकून देण्यात येते. पण तुम्हाला माहितीये का, चहा गाळून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली पावडर उपयोगात आणली जाऊ शकते. चहा पावडरचा दैनंदिन जीवनात उपयोग कसा करता येऊ शकतो, हे जाणून घेऊया… (Benefits Of Tea Powder)
चहा बनवून झाल्यानंतर जी शिल्लक असलेली चहा पावडर राहते ती पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घ्यावी, यानंतर चहा पावडर एका प्लेटमध्ये घालून ती उन्हात वाळवावी. यानंतर या पावडरचा अनेक प्रकारे उपयोग करता येतो. ते पुढील प्रमाणे…
ग्रामीण आणि शहरी भागात खास करून काही ठिकाणी लाकडी फर्निचरचा वापर केला जातो. कारण ते टिकाऊ आणि आकर्षक डिझाईन असल्याने लोक हे फर्निचर खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढतो. मात्र, कालातरांने या लाकडी फर्निचरवर घाण, धूळ बसते. अशावेळी वाळवलेल्या चहा पावडरमध्ये पाणी घालून कापडाने लाकडी फर्निचर स्वच्छ केल्यास त्याला नव्यासारखी चमक येते. या पावडरचा, असा उपयोग घरात केला जाऊ शकतो.
धावपळीच्या जीवनात महिलांना केसांच्या काळजी घेण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी काही महिला वेळ काढून पार्लरमध्ये जाऊन केस धूणे किंवा कलर करत असतात. मात्र, स्वंयपाक घरातील चहा पावडर जी ओल्या कच-यात आपण फेकून देतो ती केसांसाठी खूपच उपयुक्त आहे, हे तुम्हाला माहित आहे का? वाळलेल्या चहापावडरमध्ये पाणी घालून ते चांगले उकळून घ्यावे. यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना लावावे. केसांच्या मुळांना मसाच केल्यानंतर केस पाण्याने धुवून टाका. असे महिन्यातून तीन-चार वेळा केल्यास केसांतील कोंडा कमी होतो आणि केस घनदाट आणि चमकदार होण्यास मदत होते.
वाळलेल्या चहाच्या पावडरचे खत म्हणूनही झाडांना उपयोग होतो. वाळलेली चहा पावडर मातीत मिसळून किंवा तशीच झाडांच्या मुळात खत म्हणून वापरता येते. यामुळे झाडांना चांगली वाढ होते आणि फळे, फुले येण्यास मदत होते.
चहा पावडरमध्ये अँटी-ऑक्सिंडट हा घटक असतो. यामुळे जर एखाद्याला जखम झाल्यास अथवा खरचटल्यास त्यावर वाळलेल्या पावडरमध्ये पाणी घालून त्याचा लेप त्या जागी लावावा. यामुळे रक्तस्त्राव बंद होऊन जखमा लवकरच भरण्यास मदत होते. यामुळे वेदनाही कमी होते.
थोडी वाळलेली चहा पावडर घेऊन त्यात पाणी घालून गोळा तयार करावा. हा गोळा डोळ्यांवर किवां डोळ्यांखाली ठेवावा. किमान दहा मिनिटे हा गोळा डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्याची खाली येणारी सूज आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेची जळजळ होत असेल तेथे चहा पावडर लावण्याने जळजळ कमी होऊन आराम मिळतो. आठवड्यातून किमान ३ दिवस हा उपाय केल्यास फरक जाणवतो.
प्रत्येकाच्या घरातील फ्रिजमध्ये अनेक वस्तू ठेवल्या जातात. यात फळे, जेवण, पाणी, लिंबू, भाज्या, दही- दूध- ताक, सॉस, कोल्ड्रिंक्स यांसारख्या अनेक प्रकारचे साहित्य फ्रिजमध्ये ठेवले जाते. यामुळे फ्रिजमध्ये एक प्रकारची दुर्गधी पसरते. अशा वेळी वाळलेली ही चहा पावडरची एक थैली फ्रिजच्या कोपऱ्यात ठेवून द्यावी. फ्रिजमधली दुर्गंधी कमी होण्यास मदत होते. हळूहळू दुर्गंधी कमी होत भाज्यांचा उग्र वास कमी होतो.
प्रत्येकाच्या घराच्या दारात पायपुसणी पाहायला मिळतेच. परंतु, या पायपुसणीवरून ये-जा केल्याने कालांतरांनी याचा उग्र वास येण्यास सुरूवात होते. किंवा बाहेरून आल्यावरून बुटांतूनदेखील दुर्गंधी येत असते. अशावेळी पायपुसणी धुताना धुण्याच्या सोड्यासोबत वाळलेली चहा पावडर घालावी. यामुळे काही काळ पायपुसणीतून दुर्गंधी येणार नाही. तर दिवसभर घातलेल्या पायाच्या बुटांतून दुर्गंधी येत असेल तर ही चाहा पावडर रात्रभर एका कागदात बाधून ठेवून द्यावी. यामुळे त्यातीलदेखील दुर्गंधी कमी होते.
जर कोणालाही दातदुखीचा त्रास होत असेल तर वाळलेल्या चहाची पावडर कोमट पाण्यात टाकवी. यानंतर या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे दातदुखी कमी होऊन आराम मिळेल. यासारख्या अनेक समस्यावर चहा पावडर गुणकारी आहे. यामुळे आता घरातील चहा पावडर फेकून न देता वाळवून त्याचा योग्य पद्धतीने वापर करा. ( Benefits Of Tea Powder )