मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कर्करोगाच्या उपचारात आणखी एक यश टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTRAC) च्या डॉक्टरांनी मिळवले आहे. डॉक्टरांनी आयडीआरएस लॅब्सच्या सहकार्याने तोंडावाटे घेण्यासाठी पावडरच्या स्वरूपात रक्ताच्या कर्करोगाच्या (Blood cancer) उपचारात वापरले जाणारे मर्क्पटॉपुरिन (Mercaptopurine) नावाचे औषध विकसित केले आहे. त्यामुळे ब्लड कॅन्सरग्रस्त लहान मुलांना योग्य डोस मिळू शकेल. आतापर्यंत हे औषध केवळ परदेशात पावडरच्या स्वरूपात उपलब्ध होते. पण टाटांच्या डॉक्टरांमुळे आता भारतातही उपलब्ध झाले आहे.
संबंधित बातम्या :
टाटा हॉस्पिटलच्या क्लिनिकल फार्माकोलॉजीचे प्रोफेसर डॉ. विक्रम गोटा यांनी सांगितले की, मर्क्पटॉपुरिन (Mercaptopurine) नावाचे औषध तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) च्या उपचारात वापरले जाते. जो लहान मुलांमधील ब्लड कॅन्सर (Blood cancer) हा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे केमोथेरपी औषध आहे जे टॅब्लेटच्या स्वरूपात उपलब्ध आहे आणि त्याची मात्रा ५० मिलीग्रॅम आहे. तथापि, लहान मुले या औषधाचा कमी डोस घेतात. टॅब्लेटच्या मोठ्या प्रमाणामुळे, लहान मुलांना त्याचा डोस देताना डॉक्टरांना अनेकदा ती एक दिवसासाठी घेणे किंवा टॅब्लेट क्रश करण्याचा पर्याय निवडावा लागत असल्याने कधी डोस जास्त तर कधी कमी होत असे. त्यामुळेच पावडर स्वरूपात उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली २०१८ पासूनच काम सुरू होते. यासाठी बालरोग कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बाणावली व इतर डॉक्टरांची मदत घेण्यात आली. अखेर पाच वर्षांच्या मेहनतीनंतर हे औषध तोंडावाटे घेण्यासाठी उपलब्ध झाले आहे. ही पावडर गरम पाण्यात मिसळून ते मुलांना डोसनुसार द्रव स्वरूपात देता येते.
डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले, हे औषध युरोप आणि अमेरिकेत पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. पण टाटांच्या डॉक्टरांमुळे ते आता भारतातही उपलब्ध झाले आहे. हे औषध 'प्रिवेल' नावाने उपलब्ध असेल. त्याचे प्रमाण १० मिग्रॅ असून ते १०० मि.ली.मध्ये उपलब्ध आहे. ब्लड कॅन्सरने ग्रस्त १ ते १० वयोगटातील अंदाजे १० हजार मुलांना दरवर्षी याचा फायदा होईल.
हेही वाचा :