Heart Hole Problem : हृदयाच्या छिद्राची समस्या | पुढारी

Heart Hole Problem : हृदयाच्या छिद्राची समस्या

डॉ. मनोज शिंगाडे

हृदयाला छिद्र असणे हा जन्मजात दोष आहे. अर्भक जन्माला येताना हृदयाच्या रचनेतील असलेल्या समस्येमुळे हा दोष निर्माण होतो. हृदयाच्या काही समस्यांमध्ये आनुवांशिक हादेखील एक महत्वाचा घटक आहे.

एका पाहणीनुसार, भारतातील 10 टक्के बालमृत्यू दरांमागे जन्मजात हृदयरोग हे एक कारण आहे. लहान मुलांसाठी हृदयरोग सेवा भारतात अजूनही बाल्यावस्थेत आहे, असे या पाहणीकर्त्यांचे म्हणणे आहे. ( Heart Hole Problem )

संबंधित बातम्या 

हृदयाच्या वरील दोन कप्प्यांच्या झडपेत असणारे छिद्र या दोषाला ‘आर्टिअल सेप्टल डिफेक्ट’ म्हणजेच एएसडी म्हणतात, तर हृदयाच्या खालच्या बाजूच्या कप्प्यातील झडपेत असणारे छिद्र या दोषाला ‘व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट’ म्हणजेच व्हीएसडी असे म्हटले जाते. हे दोन्ही दोष असले तरीही डाव्या बाजूने उजवीकडे रक्ताभिसरण होत असते. त्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त कमी ऑक्सिजनयुक्त रक्तात मिसळले जाते.

परिणामी, ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराकडे पाठवण्याऐवजी फफ्फुसाकडे जाते. बहुतांश वेळा एएसडी प्रकारचा हृदयाला छिद्र हा दोष घेऊन जन्माला येणार्‍या बाळांमध्ये कोणतीही पूर्वलक्षणे दिसत नाहीत; मात्र लहान वयातच, पण थोडे मोठे झाल्यावर काही लक्षणे दिसू लागतात. हृदयाचा श्वासाबरोबर मंद आवाज येणे हे सर्वसाधारण लक्षण असते.

हृदयाचे ठोके पडत असताना एक असाधारण ध्वनी ऐकायला येतो. एएसडीमधील आकाराने मोठे असलेल्या हृदयाच्या छिद्राची दुरुस्ती न केल्यास हृदयाच्या उजव्या बाजूला जाणारे अतिरिक्त रक्त हृदय आणि फुफ्फुसे निकामी करू शकते. परिणामी, हृदय बंद पडू शकते. अर्थात, ही स्थिती प्रौढ वयात येते.

संकेत आणि लक्षणे

थकवा, शारीरिक श्रमाच्या कामात लवकर थकवा येणे

श्वास अपुरा घेणे

फुफ्फुसात रक्त आणि पाणी होणे

निदान कसे केले जाते?

शारीरिक तपासणी करूनच डॉक्टर हृदयातील छिद्राचे निदान करतात. काही तपासण्या करून त्याचे निदान होते. एएसडी प्रकारातील समस्या ही खूप सहजपणे सापडत नाही. त्यामुळेच या प्रकाराचे निदान लहान वयात किंवा प्रौढ वयात होऊ शकतेच असे नाही. इकोकार्डिओग्राफी, छातीचा एक्स-रे, ऑक्झिमेट्री किंवा कार्डियाक कॅथेटरायझेशन या पद्धती निदान करण्यासाठी वापरल्या जातात.

उपचार

हृदयाला असलेल्या खूपशा छिद्रांवर उपचाराची गरज भासत नाही; पण काही छिद्रांच्या समस्येवर उपचार करावे लागतात. हे उपचार लहान असताना किंवा थोडे मोठे झाल्यावर केले जातात. काही प्रौढांमध्येही हृदयाच्या छिद्रावर उपाय केले जाऊ शकतात. कोणत्या प्रकारची समस्या आहे, त्यावर उपचार अवलंवून असतात. अर्थात, बाळाचे आरोग्य, वय, वजन, सर्वसाधारण प्रकृती या सर्व गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

प्रिमम किंवा सायनस व्हेलॉसस प्रकारातील एएसडीमध्ये ओपन हार्ट शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. काही अभ्यासकांच्या मते, बहुतांश वेळा बाळाच्या शालेयपूर्व काळापर्यंत अर्ध्याहून अधिक व्हीएसडी प्रकारातील हृदयाची छिद्रे आपोआप बंद होतात. बाळाचे डॉक्टर किती काळाने नियमित तपासणी करायची, त्याची कल्पना पालकांना देतात.

नियमित तपासणीचा कालावधी हा महिन्यातून एकदा ते वर्षातून किंवा दोन वर्षांतून एकदा अशा प्रकारचा असू शकतो. व्हीएसडी प्रकारातील छिद्र बंद करण्यासाठी शस्त्रक्रिया आणि पूरक पोषक आहार यापैकी पर्याय उपलब्ध आहेत. नवनव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने नाजूक हृदयाची काळजी घेण्याच्या पद्धती उपलब्ध आहेत. (Heart Hole Problem)

Back to top button