धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे सोलापूर महामार्गावर अज्ञात आयशरने हुलकावणी दिल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस रस्त्यालगत उलटून अपघात ग्रस्त झाली. या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून यात बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने तातडीने हालचाली करीत या जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले असून सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
चाळीसगाव कडून धुळ्याकडे येणाऱ्या एम एच 14 बी टी 27 10 या क्रमांकाच्या बस मध्ये तरवाडे आणि परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी धुळे शहराकडे येण्यासाठी निघाले. ही बस तरवाडे पासून काही अंतरावर आल्यानंतर धुळे शहराकडून चाळीसगाव कडे जाणाऱ्या एका अज्ञात आयशर गाडीने एसटी बस चालकाला हुलकावणी दिली. त्यामुळे ही बस रस्त्यालगत कोसळली. रस्त्यालगत बस उलटल्यामुळे प्रवासांनी बचावासाठी आरडाओरडा सुरू केला. दरम्यान ही माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दूरध्वनी वरून कळाल्याने त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क साधून घटनास्थळी रवाना केले. या पाठोपाठ त्यांचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे तातडीने जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. जखमींवर तातडीने उपचार सुरू झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी हे सुखरूप असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अपघात झाल्याची माहिती कळाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
जखमींमध्ये ललिता शिरोडे, सतीश शिरोडे, सुजाता कोळी, नेहा माळी, निकिता जमादार, सानिका पाटील, सीमा जमादार, सुरेश सोनवणे, भाग्यश्री माळी, चेतन पाटील, विजय केदार, छाया महाजन, साक्षी महाजन, ईशान महाजन, पृथ्वीराज जाधव, विजय गांगुर्डे, विष्णू पाटील, सचिन राठोड, राहुल चव्हाण, अनिल पवार, ऋषिकेश एंडाईत, अरूण पाटील, अनिल सोनजे, गोपाल डालवाले, रामसिंग वसावे आदींचा समावेश आहे.