मिनी ऑलिम्पिक जानेवारीत; प्रथम मान मिळाला पुण्याला | पुढारी

मिनी ऑलिम्पिक जानेवारीत; प्रथम मान मिळाला पुण्याला

सुनील जगताप

पुणे : कोरोनाच्या आधीपासूनच मिनी ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याबाबतच्या निव्वळ घोषणा होत होत्या. मात्र, या वर्षी या स्पर्धा घेण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे जानेवारीत मिनी ऑलिम्पिकचा ‘बिगुल’ वाजणार असून, तब्बल 33 खेळांचा यात समावेश असेल. दरवर्षी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (एमओए) मिनी ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्याबाबत आश्वासन दिले जाते. परंतु, त्यावर मात्र पुढे काही अडचणींमुळे स्पर्धाच होत नसल्याचे आढळून आले आहे. कोरोनामधील दोन वर्षांमध्ये कोणत्याच स्पर्धा पार पडल्या नाहीत. परंतु, या वर्षी शालेय स्पर्धांपासूनच सर्व स्पर्धा सुरू झाल्या असल्याने खेळाडूंना मिनी ऑलिम्पिक स्पर्धेची प्रतीक्षा होती.

एमओएची निवडणूक पार पडल्यानंतर सरचिटणीस म्हणून आलेल्या नामदेव शिरगावकर यांनी या स्पर्धा घेण्याबाबतचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला. एमओएचे अध्यक्ष अजित पवार हे तेव्हा अर्थमंत्री होते. त्यामुळे त्यांनी त्वरित निधीचीही तरतूद केली आणि स्पर्धेला हिरवा कंदील दाखविला. मात्र, त्यानंतर सत्तांतर झाल्याने हा विषय पुन्हा मागे पडला होता. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अधिकार्‍यांसह खेळाडू, क्रीडा शिक्षकांकडून मैदानांची आवश्यकता, यांसह विविध गोष्टींवर काम सुरू झालेले आहे. या सर्व कामांचा आढावा असलेला अहवाल शासनाला सादर केला जाणार असून, या स्पर्धा जानेवारीत घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतरच या स्पर्धा सुरू होण्याची शक्यता दिसून येत आहे.

मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबतची तयारी सुरू आहे. खेळाडू, मैदानांची व्यवस्था आदींवर सध्या काम सुरू असून, त्याचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष क्रीडामंत्री गिरीश महाजन आणि कार्याध्यक्ष, एमओचे अध्यक्ष अजित पवार यांना सादर केला जाणार आहे. या अहवालावर चर्चा होऊन नंतरच स्पर्धेची अधिकृत घोषणा केली जाईल. तूर्तास स्पर्धेची तयारी सुरू आहे.

                – नामदेव शिरगावकर, सरचिटणीस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन

 

Back to top button