Passport and Rules : पासपोर्ट काढायचाय? ‘ही’ माहिती जाणून घेणे ठरते आवश्‍यक

Passport and Rules : पासपोर्ट काढायचाय? ‘ही’ माहिती जाणून घेणे ठरते आवश्‍यक
Published on
Updated on

नवीन पासपोर्टसाठी अपॉईंटमेंट घेऊ इच्छिणार्‍यांनी काही गोष्टींची आधी माहिती करून घेणे आवश्यक ठरते. आवश्यक कागदपत्रे, फॉर्म भरण्यापासून ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत विविध बाबी समजून घेतल्यास प्रक्रिया सोपी होईल. ( Passport and Rules )

प्रथम अर्जदारांनी passportindia.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरावा आणि पेमेंट करावे. त्यानंतर अर्जदारांनी पेमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी पुन्हा याच संकेतस्थळावर लॉगिन करावे. एकदा ते पूर्ण केल्यावर अपॉईंटमेंट निश्चित झाल्याचे संकेतस्थळावर दिसेल.

Passport and Rules : …तर शुल्क जप्त होऊ शकते

ज्या अर्जदारांनी त्यांच्या अपॉईंटमेंटस् आधीच बूक केल्या आहेत, ते त्यांच्या अपॉईंटमेंटस् फक्त एकदाच पुन्हा निश्चित (रिशेड्यूल) करू शकतील आणि जर असे अर्जदार अपॉईंटमेंटस् साठी हजर झाले नाहीत, तर त्यांना त्यांच्या अपॉईंटमेंटस् पुन्हा निश्चित करण्याची कोणतीही संधी दिली जात नाही. अशा अर्जदारांचे अर्ज शुल्क जप्त होऊ शकते.

तत्काळ योजनेंतर्गत पासपोर्टसाठी…

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना स्वीकार्य कागदपत्रांच्या पुढे नमूद केलेल्या सूचीमधील कोणतीही तीन कागदपत्रे समाविष्ट (सबमिट) करावी लागतील. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अर्जदारांना कागदपत्रांच्या नमूद केलेल्या सूचीमध्ये अनुक्रमांक 1 ते 6 मधील कोणतीही दोन कागदपत्रे समाविष्ट करावी लागतील.

Passport and Rules : ही कागदपत्रे महत्त्वाची

सर्व कागदपत्रांमध्ये नमूद केलेले तपशील (जसे की पूर्ण नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव) सारखेच असल्याची खात्री करा. यूआयडीएआयद्वारे जारी केलेले आधार कार्ड, संपूर्ण मूळ आधार कार्ड, यूआयडीएआयद्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेली सत्यप्रत, चिन्हासह जारी केलेले ई-आधार कार्ड (लहान कापलेले आधार कार्ड, बाहेरून बनविलेले स्मार्ट कार्ड स्वीकारले जाणार नाही), पॅन कार्ड, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले विद्यार्थी ओळखपत्र, जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा 1969 अंतर्गत जारी केलेले जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शेवटचा जारी केला गेलेला पासपोर्ट फक्त पासपोर्ट(रिइश्यू प्रकरणात), मतदार ओळखपत्र, राज्य/केंद्र सरकार, कपन्यांद्वारे जारी केलेले सेवा फोटो ओळखपत्र, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र, शस्त्रास्त्र कायदा 1959 अंतर्गत जारी केलेला शस्त्र परवाना, निवृत्तीवेतन कागदपत्र, जसे की माजी सैनिकांचे पेन्शन बुक किंवा निवृत्त सरकारी कर्मचारी, माजी सैनिकांची विधवा किंवा अवलंबित्व, वृद्धापकाळ पेन्शन ऑर्डर यांना जारी केलेले पेन्शन पेमेंट ऑर्डर, बँक पासबुक, किसान पासबुक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक (अर्जदारांच्या फोटोसह आणि नवीनतम स्टेटमेंट अपडेट केलेले), ड्रायव्हिंग लायसेन्स (वैध आणि महाराष्ट्र राज्याच्या अधिकार क्षेत्रातील) यापैकी अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांपैकी किमान एकामध्ये सध्याचा पत्ता नमूद केलेला असावा.

अशी आहेत राज्यातील पासपोर्ट कार्यालये

क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुण्याचे मुख्य कार्यालय बाणेर येथे आहे. कार्यालयाच्या अंतर्गत, मुंढवा (पुणे) आणि सोलापूर येथे दोन ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. याचबरोबर अहमदनगर, बारामती, बीड, इचलकरंजी, जालना, कोल्हापूर, लातूर, माढा, नांदेड, उस्मानाबाद, पंढरपूर, परभणी, पिंपरी-चिंचवड, सांगली, सातारा, शिरूर आणि श्रीरामपूर येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, अशी एकूण 17 लघू कार्यालये आहेत.

हे लक्षात घ्या…

पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदारांनी तत्काळ श्रेणीअंतर्गत अपॉईंटमेंट बूक केल्यास आणि आवश्यक 3 कागदपत्रे नसल्यास, त्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

येत्या 3 डिसेंबर रोजी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, पुणेंतर्गत सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे पासपोर्ट अर्जदारांसाठी सुरू ठेवली जातील. अर्जदार सामान्य आणि तत्काळ या दोन्ही श्रेणींमध्ये नवीन अपॉईंटमेंटस् बूक करू शकतील किंवा त्यांच्या आधीच बूक केलेल्या अपॉईंटमेंटस् रिशेड्यूल करू शकतील.
– डॉ. अर्जुन देवरे, विभागीय पासपोर्ट अधिकारी, पुणे

  • संकलन : शिवाजी शिंदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news