कीव्ह; पुढारी ऑनलाईन डेस्क
Breadbasket of the World : रशियाकडून युक्रेनवर (Russia Ukraine conflict) सुरु असलेल्या आक्रमणामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. युक्रेनमधील १० लाखांहून अधिक लोकांनी शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. रशिया- युक्रेन संघर्षाची झळ युरोपसह संपूर्ण जगाला बसली आहे. दोन देशांतील युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील देशांना होणारा धान्य पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे विशेषतः आफ्रिकेतील गरीब लोकांच्या उपजीविकेला धोका निर्माण झाला असल्याचे वृत्त एपी (AP) या वृत्तसंस्थेने दिले आहे.
युक्रेनमधील काळ्या समुद्राचा प्रदेश (Black Sea region) हा सुपीक आहे. हा भाग जगाचा ब्रेडबास्केट (Breadbasket of the World) म्हणून ओळखला जातो. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू (wheat) आणि बार्लीचे (barley) मोठे निर्यातदार देश आहेत. जगातील गहू आणि बार्लीच्या निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश निर्यात या दोन देशांतून होते. युक्रेन मक्याचादेखील एक प्रमुख पुरवठादार देश आहे आणि सूर्यफूल तेल निर्यातीत तो जगात आघाडीवर आहे. पण रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील शेतकऱ्यांनी (Ukrainian farmers) देश सोडून शेजारील देशांत आश्रय घेतला आहे. बंदरे ओस पडल्याने येथून जगभरात गहू आणि इतर खाद्यपदार्थांची होणारी निर्यात थांबली आहे. त्याचबरोबर कृषीसंपन्न असलेल्या रशियावर पाश्चात्य देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे जगभरात धान्य निर्यात कमी होऊ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
युक्रेनवरील आक्रमणाच्या धास्तीने एका आठवड्यापूर्वीच गव्हाच्या किंमती ५५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर युद्ध लांबले तर, युक्रेनमधून होणाऱ्या स्वस्त गव्हाच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या देशांना जुलैपासून टंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेचे (International Grains Council) संचालक अरनॉड पेटीट यांनी 'एपी' वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
युक्रेनमधून गहू आणि मका पुरवठा थांबल्याने अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. इजिप्त आणि लेबनॉन सारख्या देशांत गरिबी आणखी वाढण्याची भिती आहे. या देशांतील लोक सरकारकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत. दरम्यान, युक्रेनवरील आक्रमणामुळे युरोपीय देशांतील अधिकारी अन्नधान्याचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन उपाययोजना आखत आहेत. कमी पुरवठ्यामुळे पशुखाद्याच्या किंमतीही वाढणार असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
इजिप्त हा जगातील सर्वात मोठा गहू आयातदार देश आहे. पण रशिया-युक्रेन संघर्षामुळे इजिप्तमध्ये गव्हाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील लोक युक्रेनमधील धान्यापासून बनवलेल्या अनुदानित ब्रेडवर अवलंबून आहेत. इजिप्तमधील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या गरिबीत जीवन जगते. इजिप्तमध्ये रशिया आणि युक्रेनमधून गव्हाची आयात होते. पण युद्धामुळे इजिप्तने आठवडाभराच्या आत गहू खरेदीच्या दोन ऑर्डर रद्द केल्या आहेत.
आफ्रिकन देशांनी २०२० मध्ये रशियाकडून ४ अब्ज डॉलर किमतीची कृषी उत्पादने आयात केली आहेत. यात सुमारे ९० टक्के गव्हाचा समावेश आहे, अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या कृषी उद्याग चेंबरचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ वांडिले सिहलोबो यांनी दिली आहे.
युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांचा जगातील एकूण सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत ७५ टक्के वाटा आहे. पण दोन्ही संघर्षामुळे सूर्यफूल तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :