मुंबई; पुढारी ऑनलाईन : सीबीआय चौकशी करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तब्बल १३ महिन्यांनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. दरम्यान, देशमुख यांना आणखी १० दिवस तरी तुरुंगातच रहावे लागणार आहे. कारण त्यांच्या जामिनास १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाविरोधात सीबीआय सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहे.
भ्रष्टाचार प्रकरणी माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या जबाबात कोणतेही तथ्य नसल्याचा युक्तिवाद केल्यानंतर तो ग्राह्य करण्यात आला. यामुळे देशमुख यांनी जामीन मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ४ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआय चौकशी करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्याला देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी देशमुख यांच्यावतीने न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही खटले एकमेकांशी जोडलेले असल्याने आणि ईडी प्रकरणात देशमुख यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांना सीबीआय प्रकरणात जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद त्यांनी केला. चौधरी यांनी असा युक्तिवाद केला की देशमुख यांनी एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे.
अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. पण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण अखेर देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
७३ वर्षीय देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अतिताण, ह्रदयविकार यांसारख्या विविध आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. सीबीआयने कथित खंडणी वसुली प्रकरणात केलेले सगळे आरोप तथ्यहीन, निराधार असल्याचा युक्तिवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
हे ही वाचा :