पुढारी ऑनलाईन डेस्क : भटक्या कुत्र्यांना, प्राण्यांना हुसकवण्यासाठी काठी वापरणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबईतल एका हाऊसिंग सोसायटीला या संदर्भातील तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Bombay HC on Stray Dogs)
न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी, आर. एन. लड्ढा यांनी हे आदेश दिले आहेत. प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी काठीचा उपयोग होत असेल, तर ती प्राण्यांविरोधात क्रुरता ठरते, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
सुरक्षा रक्षक प्राण्यांना भीती दाखवण्यासाठी काठी वापरत असतील तर तो काळजीचा विषय आहे. त्यामुळे हाऊसिंग सोसायटीने यासंदर्भातील याचिकाकर्त्याची तक्रार दाखल करून घ्यावी, जेणे करून अशा सुरक्षा रक्षकांवर कारवाई करता येईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा प्रकारची अततायी कृती ही प्राण्यांविरोधातील कौर्य आहे, यामुळे प्राण्यांच्या वर्तणुकीवरही परिणाम होतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईतील आरएनए पार्क, सीएचएसएल सोसाईटीमधील काही परिसर भटक्या प्राण्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी करणारी ही याचिका सोसाईटीमधील रहिवाशी परोमिता पुथरन यांनी दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून "वेलफेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज" या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सोसायटीत भेट देऊन अशी जागा राखीव ठेवता येईल, असा अहवाल सादर केला होता. परोमिता यांनी प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे, ती सोसायटीने विचारात घ्यावी असे न्यायालयाने म्हटले आहे.
"असे वाद परस्पर सामंजस्याने मिटवले पाहिजेत. आताचा उन्हाळा लक्षात घेता प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही सोसायटीची जबाबदारीचे आहे," असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा