मुंबई; पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन (Bollywood actress Rimi Sen) हिची गोरेगाव येथील एका उद्याजकाने तब्बल ४.१४ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी रिमी सेनने उद्योजक रौनक जतीन व्यास (Raunak Jatin Vyas) याच्या विरोधात मुंबईतील खार पोलिसांत तक्रार केली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तिच्या या तक्रारीची दखल घेत आयपीसी कल ४२० आणि ४०९ अन्वये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, जिममध्ये सदर उद्योजकाशी रिमी सेनची ओळख झाली होती. पण ही ओळख तिला महागात पडली आहे. गुंतवणूक केलेल्या रकमेवर अवघ्या ३ महिन्यांत ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यातून रिमी सेनेची तब्बल ४.१४ कोटींची फसवणूक झाली असल्याचे उघड झाले आहे.
रौनक जतीन व्यास हा या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. तो मुळचा अहमदाबाद येथील आहे. सध्या तो गोरेगाव येथे राहतो. त्याच्या मालकीची फोमिंगो बेव्हरेज नावाची कंपनी आहे. अंधेरीतील एका जिममध्ये रौनकला अभिनेत्री रिमी सेन (Bollywood actress Rimi Sen) भेटली होती. ओळखीतून पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्यानं आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या परताव्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर रिमीने सदर व्यक्तीच्या कंपनीत ४.१४ कोटींची गुंतवणूक केली होती. पण गुंतवणूक केलेल्या रकमेवर परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे रिमीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने खार पोलिस ठाण्यात रौनक व्यास विरोधात फसवणुकीची तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे.
रिमी सेननं हंगामा, बागबान, धूम, गरम मसाला, फिर हेराफेरी, गोलमाल आदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.