स्वालिया शिकलगार – पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वप्नांच्या पंखावर स्वार होऊन चित्रपट इंडस्ट्रीत उतरलेल्या एक निरागस अभिनेत्री जिया खानचा बळी गेला. तिच्या आयुष्यात असं काय घडलं होतं की, तिला आपले जीवन संपवावे लागले. एखादी मोठी घटना घडल्याशिवाय, इतके मोठे टोकाचे पाऊल ती उचलणार नाही! (Jiah khan Verdict ) जिया खानने जून २०१३ रोजी स्वत:चे जीवन संपवले होते. या प्रकरणी तिचा तथाकथित बॉयफ्रेंड सूरज पांचोलीला पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी जिया आणि सूरज लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते, असे म्हटले जात होते. आज जवळपास १० वर्षे कोर्टात सुरु असलेल्या जिया खान मृत्यूच्या प्रकरणात सूरज पांचोली निर्दोष सुटला आहे. पण, तिचा मृत्यू झाला तर तो कुणामुळे झाला? हा प्रश्न येथे रहस्यमय बनून राहिला आहे. (Jiah khan Verdict )
कुणीही आपले आयुष्य असं सहजासहजी संपवत नाही. आयुष्यात काहीतरी गंभीर घटना घडली असेल तर असे पाऊल उचलले जाते. आज तिच्या नसण्याने एका सुंदर अभिनेत्रीला गमावल्याचं दु:ख तर आहेच. शिवाय तिच्यासोबत तिचं इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्याचं सुंदर स्वप्नदेखील मातीमध्ये विरून गेलं.
जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यू-यॉर्कमध्ये झाला होता. न्यू-यॉर्कमध्ये न राहता जियाने आपली पावले सातासमुद्रापार भारतात बॉलिवूडकडे वळवली. तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. तिचे चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून जायचे. कुरळे केस, छोटे आकर्षित करणारे डोळे, मोठं कपाळ आणि लांब नाकामुळे जियाला ग्लॅमर मिळवणं सोपं होतं.
वयाच्या १६ व्या वर्षी जियाला तुमसा नहीं देखा चित्रपट ऑफर झाला होता. परंतु, तिच्या लूकमुळे तिच्या जागी दिया मिर्जाला रिप्लेस करण्यात आलं. दोन वर्षांनंतर जियाला २००७ मध्ये राम गोपाल वर्माचा चित्रपट 'नि:शब्द' मिळाला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन मुख्य नायक म्हणून होते. आपल्या वयापेक्षा तिप्पट अभिनेत्यासोबत तिने किसिंग सीन दिले. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यूसाठी ती नॉमिनेट झाली होती. लवकरच तिला २००८ आमिर खानच्या गझनी चित्रपटात संधी मिळाली. बिग बी अमिताभ बच्चन यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तिचा अभिनय सहज सुंदर होता ते गझनी चित्रपटातून आपण पाहिलचं आहे. छोट्या करिअरमध्ये ग्लॅमर मिळवणारी अभिनेत्री म्हणून जियाला प्रसिद्धी मिळाली होती.
पुढे जिया खानने कॉमेडी जॉनरमध्ये पाऊल ठेवलं. दिग्दर्शक साजिद खानचा चित्रपट हाउसफुलमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकली. अभिनयाशिवाय, जिया ट्रेन्ड सिंगर आणि डान्सरदेखील होती. जिया बालपणापासून उर्मिलाची फॅन होती. 'दिल से' मध्ये जियाने बाल कलाकाराची भूमिका केली होती.
बहरत्या करिअर दरम्यान, सूरज पांचोली तिच्या जीवनात आला. पण, तिचं प्रेम फुलण्याआधीच कोमजलं गेलं. दोघांचे प्रेम सर्वश्रुत होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचे वृत्तही समोर आले होते. पण असं काय घडलं की, जियाने इतक्या धाडसाचे पाऊल उचलले. आपले जीवन संपवण्याआधी जिया आईशी फोनवरून बोलली होती. तिने एक चिठ्ठीदेखील लिहिली होती. त्यामध्ये तिने अनेक मोठे खुलासे केले होते. तिने सूरजचे नाव पत्रात घेतले नव्हते. मी सर्वकाही गमावलं आहे म्हणत तिने पत्रात 'त्याने' आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचेही म्हटले होते.
जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जियाला सूरजने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते. सीबीआयने सूरजला ताब्यात घेऊन चौकशीही केली होती. सूरजने पॉलीग्राफी आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यास नकार दिला होता. सूरजने तुरूंगातून बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगितले होते की, जिया करिअरविषयी डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनी तिची साथ सोडली होती. ती प्रत्येक छोट्या गोष्टींवरून फोन करायची, खूपच पझेसिव्ह होती. जियाच्या मृत्ययू प्रकरणी सूरज नेहमीच आपण स्वत: निर्दोष असल्याचे म्हणत होता.
जिया खानने वयाच्या २५ व्या वर्षी आत्महत्या केली होती. जियाचा मृत्यू आजदेखील न सुटलेले कोडे आहे. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं. यश, प्रसिद्धी, ग्लॅमर मिळवणाऱ्या जियाचं दु:ख शेवटपर्यंत जगापासून लपून राहिलं.