पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमध्ये विषारी दारूमुळे हाहाकार माजवला आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने मृत्यूंचा आकडा २२ वरुन २९ झाला आहे. अशी माहिती मोतिहारी पोलिसांनी दिली आहे. मोतिहारी उत्पादन विभागाच्या सात अधिकाऱ्यांवर जिल्हा दंडाधिकारी यांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १७४ जणांना अटक करण्यात आली आहे. (Bihar hooch tragedy) मोतिहारी पोलिसांनी सर्वसामान्य जनतेला कोणत्याही विषारी पदार्थाचे सेवन न करण्याचे आवाहन केले आहे.
माहितीनुसार, मोतिहारी जिल्ह्यातील हरसिद्धि, सुगौली, पहाडपुर, तुरकौलिया येथे विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना १४ एप्रिलला घडली होती. तर २५ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. त्यातील मृतांची संख्या वाढली असून ती सोमवारी (दि.१७) २२ झाली होती. आज (दि.१८) मृतांचा आकडा वाढला असून तो २९ वर गेला आहे.
पूर्व चंपारण, मोतिहारीचे पोलीस अधीक्षक, कांतेश कुमार मिश्रा यांनी एकूण ५ पोलीस स्टेशन प्रमुख, २ ALTF प्रभारी आणि ९ वॉचमन यांना या घटनेबाबत निष्काळजीपणा केल्याबद्दल निलंबित केले आहे. या सोबतच याकडे दुर्लक्ष करणार्या उत्पादन विभागाच्या पूर्व चंपारण्य, मोतिहारी येथील जिल्हा दंडाधिकारी यांनी एकूण ०७ पदाधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे.
आतापर्यंत एकूण २९ जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला असून त्यात ९ जणांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. मोतिहारी पोलिसांकडून अवैध दारूच्या वसुलीसाठी व दारू तस्करांच्या अटकेसाठी सातत्याने छापे टाकण्यात येत असून गेल्या तीन दिवसात एकूण १७४ जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १७२९.५३ लिटर देशी दारू व ४९.८५५ लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. २२०० लिटर अर्धनिर्मित दारू नष्ट करण्यात आली आहे.
हेही वाचा