मोठी बातमी: पुण्यातील शाळा बनली दहशतवादी प्रशिक्षणाचे केंद्र, ‘एनआयए’ने दोन मजले केले सील | पुढारी

मोठी बातमी: पुण्यातील शाळा बनली दहशतवादी प्रशिक्षणाचे केंद्र, 'एनआयए'ने दोन मजले केले सील

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील अश्रफनगर रोड भागातील ब्यू बेल या शाळेत दहशतवादी कारवाया सुरू असल्याची खबर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळताच त्यांनी या शाळेचे दोन्ही मजले सील करून तेथे 24 तास पोलिसांचा कडक पहारा बसवला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही संघटना या ठिकाणी दहशतवादी कारावायांसाठी लागणारे प्रशिक्षण काही मुस्लीम तरूणांना देत असल्याचा ठपका एनआयने पीएफआयवर ठेवत ही कारवाई केली.

रविवारी (दि. 16) एनआयएने ही कारवाई केली. यात ब्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला सील करण्यात आला आहे. पीएफआयद्वारे दहशतवादी कारवायांच्या तयारीसाठी या मजल्यांचा वापर केला असल्याचा ठपका ठेवला आहे. या ठिकाणी पीएफआय मुस्लीम तरूणांना भरती करत होते. 2047 पर्यंत इस्लामीक राजवट स्थापन करण्यास विरोध करणार्‍यांना संपविण्यासाठी त्यांना शसस्त्र व निशस्त्र प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा दावा एनआयएने केला आहे.

मागील वर्षी 22 सप्टेंबरला एनआयएने पुण्यातील शाळेतील या दोन मजल्यांची झडती घेतली होती. तसेच येथील कागदपत्रे जप्त केली होती. त्या कागदपत्रांच्या मजकुरातील अभ्यास केल्यानंतर रविवारी एनआयएने ही कारवाई केली. या कागदपत्रातूनच पीएफआय मुस्लीम तरूणांना शस्त्राचे प्रशिक्षण देत असल्याचे उघड झाले आहे. पीएफआय ही देशातील प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी करत होती. यात त्यांच्या विचारसरणीला विरोध करणार्‍या प्रमुख नेत्यांना टार्गेट करून त्यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा दावाही एनआएने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

Back to top button