धारूर: पुढारी वृत्तसेवा : धारूरच्या घाटामध्ये शनिवारी सकाळी सव्वानऊ वाजता एसटी बस व कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले. शाहूराव प्रल्हाद काजवे (वय ६०) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. रोहीदास शिंदे यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर- बीड बस धारूर घाटामध्ये आली असता समोरून वडवणीहून कार येत होती. यावेळी एका दुचाकीला वाचवण्याच्या नादात बस (क्रमांक एम् एच २० बी एल २९३०) आणि कारची ( क्रमांक एम एच ४४ एस ९१०५) समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या.
धारूरच्या घाटामध्ये दररोज अपघाताची मालिका सुरूच आहे. अरुंद घाट असल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यामुळे घाटाचे रुंदीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून वाहनधारक आणि नागरिकांतून होत आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. घाटातून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आणखी किती अपघात होण्याची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचलंत का ?