जालना : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची एन्ट्री होणार; अर्जुन खोतकरांचे घाडगे यांना जाहीर आवाहन | पुढारी

जालना : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटाची एन्ट्री होणार; अर्जुन खोतकरांचे घाडगे यांना जाहीर आवाहन

वडीगोद्री,पुढारी वृत्तसेवा : घाडगे- पाटील आपण उद्योगामध्ये प्रचंड प्रगती केली, आता राजकारणात प्रगती करा. मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव घेऊन आलो आहे. आपण यावर नक्की विचार कराल यासाठी गणपती बाप्पा तुम्हाला सद्बुद्धी देतील असे सूचक व्यक्तव्य करत समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाडगे यांना शिंदे गटात येण्याचे जाहीर निमंत्रण राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.

पुढे बोलताना खोतकर म्हणाले की, सतीश घाडगे यांनी समृद्धी शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच विघ्न दूर केलेलं आहे. यामुळे ते निश्चित विचार करतील यामुळे मी त्यांना या पवित्र ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी आलो आहे त्यांनी विचार करावा. ८ सप्टेंबर रोजी घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथे समृद्धी गणेश फेस्टिव्हल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे गटाचे उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाडगे हे निमंत्रण दिले. यामुळे आता राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यात समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाडगेची एन्ट्री होणार असून यासाठी घाडगे यांनी राजकीय मैदानात येण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहे.

माजी राज्य मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या जाहीर आमंत्रणानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना घाडगे म्हणाले की, साखर कारखान्यासारखा उद्योग करत असताना अनेक अडचणी येतात. गणेश फेस्टिव्हल असल्याने सर्व पक्षीयांना निमंत्रित केलं आहे. कार्यक्रमात मला ऑफर दिली आहे, बघू विचार करूयात २०२४ ची निवडणूक लढणार असेल तर निश्चित कळवू. यामुळे आता राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा बालेकिल्ला असलेल्या घनसावंगी मतदारसंघाच्या राजकारणात शिंदे गटाची एन्ट्री होणार असून यासाठी समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश घाडगे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे आता राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदे गट चर्चेत आला आहे. येणाऱ्या काळात शिंदे गट सक्रिय झाला तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कारखानदार टोपे विरुद्ध कारखानदार घाडगे पाटील असा सामना रंगणार या चर्चेला उधाण आलं आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button