नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे देशभरात चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. जनतेने तयारी करताना सावधगिरी बाळगावी. देशभरात आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहीती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्या आहेत.
देशात सध्या दिवसाला नव्याने २०० ते २५० कोरोना रुग्ण आढळून येत असून, तीन हजार ५०० रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जेएन १ या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र व गोवा या राज्यांमध्ये प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. या राज्यांमध्ये विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र, सध्या सुटीचे दिवस असल्याने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत असल्याने खबरदारीच्या सूचना यंत्रणेला करण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने तिथे जास्त प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना नियमांचे पालन करण्याबरोबरच चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. २२ जानेवारी २०२३ला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले जात असल्याने देशभरातील लाखो भाविकांची गर्दी राम जन्मभूमीत होणार असल्याने आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक, इतर व्याधींनी त्रस्त असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :