पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शहा यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेटचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी दुसऱ्यांदा मांडला. या प्रस्तावाला बाली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ACC च्या सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.
हे ही वाचा :
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये शहा यांनी पहिल्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली होती. शहा यांच्या नेतृत्वाखाली ACC ने २०२२ मध्ये T20 फॉरमॅटमध्ये आणि २०२३ मध्ये एकदिवसीय (ODI) फॉरमॅटमध्ये आशिया चषकाचे यशस्वी आयोजन केले होते.
"आशियाई क्रिकेट परिषद मंडळाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहिले पाहिजे. ज्या प्रदेशात खेळ अजूनही प्रारंभावस्थेत आहे त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे. ACC संपूर्ण आशियातील क्रिकेटचे नेतृत्व करण्यासाठी वचनबद्ध आहे", असे शहा यांनी निवेदनात म्हटले आहे.
"शह यांच्या मार्गदर्शनाखाली बांगलादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारख्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या देशांमध्ये नवीन प्रतिभा शोधण्यात आणि प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई क्रिकेट परिषदेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे," असे शम्मी सिल्वा यांनी म्हटले.
ओमान क्रिकेटचे अध्यक्ष आणि एसीसीचे उपाध्यक्ष पंकज खिमजी यांनीही शहा फेरनिवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. "आज स्टेकहोल्डर्सना ACC आयोजित स्पर्धांमध्ये गुंतवणूक करणे मोलाचे वाटते आणि याचे श्रेय त्यांना जाते. ज्यामुळे या प्रदेशातील खेळाच्या वाढीला चालना मिळेल," अशी प्रतिक्रिया खिमजी यांनी दिली आहे.