पुढारी ऑनलाईन डेस्क : रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून खेळणाऱ्या अग्निदेव चोप्राने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या 4 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शतके झळकावून इतिहास रचला आहे. अग्निदेव चोप्रा हा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. ज्याने आपल्या कारकिर्दीतील पहिल्या चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. अग्निने यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून या 25 वर्षीय फलंदाजाने खेळलेल्या चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये शतके झळकावून भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. Agni Chopra
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचा अग्निदेव हा मुलगा आहे. अग्निची आई अनुपमा चोप्राने सोशल मीडियावर 'प्राउड मॉम' या कॅप्शनसह अग्निच्या विश्वविक्रमाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. Agni Chopra
अग्निदेव चोप्राने सिक्कीम, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि आता मेघालय विरुद्ध शतके झळकावून धमाका केला आहे. सिक्कीमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अग्निदेव चोप्राने १६६ आणि ९२ धावांची खेळी खेळली होती. त्याचवेळी नागालँडविरुद्ध १६६ आणि १५ धावा केल्या होत्या. यानंतर अग्नीने अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ११४ आणि १० धावांची इनिंग खेळली. त्याचबरोबर मेघालयविरुद्ध या फलंदाजाने पहिल्या डावात १०५ धावा आणि दुसऱ्या डावात १०१ धावा करत धमाका केला आहे.
सध्या रणजी ट्रॉफी सुरू असून या मोसमात अग्नी चोप्रा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत ८ डावांत ७७५ धावा केल्या आहेत. त्याची फलंदाजी सरासरी ९६.२८ होती. अग्नीने आतापर्यंत ४ सामन्यात ५ शतके झळकावली आहेत. या मोसमात रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाजही अग्निदेव चोप्रा आहे. रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तन्मय दुसऱ्या स्थानावर आहे. ४ डावात फलंदाजी करताना तन्मयने आतापर्यंत एकूण ५९४ धावा केल्या आहेत.
अलीकडे सुपरहिट ठरलेला चित्रपट '12th Fail' विधू विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अग्निदेव यांचे ते वडील आहेत, तर त्यांची आई सुप्रसिद्ध लेखिका, पत्रकार आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा या आहेत. अनुपमा चोप्रानेही मुलासाठी एक पोस्ट शेअर करत "प्राउड मॉम" असे कॅप्शन दिले आहे.
हेही वाचा