पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा सलामीवीर आणि कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवाल याला त्रिपुराची राजधानी आगरतळा विमानतळावरुन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरतला विमानाने प्रवास करण्यापूर्वीच त्याला तोंडात आणि घशात जळजळ होत असल्याची तक्रार त्याने केली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. दरम्यान,. मयंकने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्याविरोधात कट रचल्याचा आरोप त्याने केला आहे. ( Mayank Agarwal files police complaint after health scare in New Delhi-bound flight )
आगरतळा येथून विमानाने मयंक अग्रवाल दिल्लीला जाणार होता. इंडिगोच्या फ्लाइटमध्ये त्याच्या सीटवर एक बाटली ठेवण्यात आली होती. मयंकने पाणी समजून या बाटलीतील पाणी पिले. काही क्षणातच त्याच्या तोंडात आणि घशात प्रचंड जळजळ जाणवू लागली. त्याला बोलताही येत नव्हते. त्याला तत्काळ आयएलएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयंकने या प्रकरणी त्याच्या व्यवस्थापकामार्फत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, या घटनेला पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी दुजोरा दिला आहे. मयंकच्या व्यवस्थापकाने न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणी त्रिपुराचे आरोग्य सचिव किरण गित्ते म्हणाले की, "क्रिकेटपटू मयंक अग्रवाल याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आम्ही काय घडले याचा तपास करू.
मयंकच्या प्रकृतीबाबत मंगळवारी रात्री उशिरा आयएलएस रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले की, " मंगळवारी सायंकाळी क्रिकेटपटू मयंक अग्रवाल याला आगरतळा एमबीबी विमानतळावरुन आयएलएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याला तोंडाची जळजळ हाेत हाेती. तसेच ओठांवरही सूज होती. त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मयंक अग्रवालच्या प्रकृतीबद्दल त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सचिव बासुदेव चक्रवर्ती म्हणाले की, "मला फोन आला की मयंक अग्रवालला आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले आहे. मयंकने पाणी समजून बाटलीतील द्रव पिला. त्याला त्रास सुरु झाला. रुग्णालयात आम्ही पाहिले की, त्याचा चेहरा सुजला होता. त्याला बोलताही येत नव्हते."
हेही वाचा :