चेक बाऊन्ससाठी इंदापूरच्या शेतकऱ्याच्या खात्यातून एकाच दिवसात 104 वेळा पैसे कट; बँकेचा अजब कारभार

Cheque Books Unvalid file photo
Cheque Books Unvalid file photo

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा

भवानीनगर (ता. इंदापूर) येथील महाराष्ट्र बँकेच्या खातेदाराच्या बँक खात्यातून चेक बाउन्स झाल्याच्या दंडापोटी एका दिवसात सुमारे 37 हजार पाचशे रुपयांची कपात करण्यात आल्याचा प्रकार शेतकरी संघटनेने उघडकीस आणला आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले, सणसर येथील अजित तांबोळी यांचे भवानीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते आहे. या खात्यातून चार एप्रिल 2022 रोजी एका दिवसात 104 वेळा 354 रुपयांच्या दंडाची प्रत्येकवेळी कपात करण्यात आली. तांबोळी यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्या कर्जाची त्यांनी परतफेडदेखील केलेले आहे, परंतु ही परतफेड करताना चेक बाऊन्स झाल्यामुळे बँकेने हा दंड आकारला आहे.

आणखी एका शेतकऱ्याला बारा हजारांचा दंड

याबरोबरच अरुण रायते यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. त्यांनीदेखील संबंधित फायनान्स कंपनीची कर्जाची परतफेड केली असून परतफेड करत असताना चेक बाउन्स झाल्यानंतर चेक बाउन्सच्या नावाखाली बँकेने त्यांच्या बचत खात्यातून दंडाच्या नावाखाली बारा हजार पाचशे रुपयांची कपात केली आहे.

पी. एम. किसान योजनेच्या पैशांतूनही कपात

बाळासाहेब तुळशीराम घोळवे यांचेही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते असून या बचत खात्यामध्ये पी. एम. किसान योजनेचे पैसे जमा होतात. हे पैसे जमा झाल्यानंतर या बँकेने त्यांच्या बँक खात्यातून फायनान्स कंपनीच्या चेक बाउन्सच्या दंडापोटी चार हजार रुपयांची कपात केली आहे.

वास्तविक पाहता पी. एम. किसान योजनेच्या पैशांतून कोणतीही कपात करण्याचा अधिकार बँकेला नाही. हे पैसे शेतकऱ्याला रोख स्वरूपात मिळाले पाहिजेत, हे तिघेही बॅंकेचे खातेदार असून कर्जदार नाहीत, असे असतानाही बँकेने फायनान्स कंपनीच्या चेक बाउन्सच्या नावाखाली केलेली कपात ही बेकायदेशीर असून या खातेदारांना त्यांचे पैसे परत मिळाले पाहिजेत. बँकेने अशा पद्धतीने अनेक शेतकऱ्यांचे बँक खात्यातून दंडात्मक रकमांची कपात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चेक बाउन्सच्या दंडापोटी 354 रुपयांची कपात करण्यात येते, त्यापैकी तीनशे रुपये हे बँकेच्या मुख्य शाखेमध्ये प्रोसेसिंग फी म्हणून जातात व 54 रुपये हे केंद्र सरकारला जातात, मग पंतप्रधान मोदी यांनी तर शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणा केली होती, तेच पैसे कापून नेत आहेत असे रायते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news